‘आश्विन शुक्ल प्रतिपदा (२६.९.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर यांचा ४५ वा वाढदिवस आहे. मी स्वयंपाकघरात सेवेला असतांना देवाच्या कृपेमुळे मला पू. रेखाताईंच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
पू. रेखा काणकोणकर यांना ४५ व्या वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सहजता
पू. रेखाताईंची प्रत्येक कृती आणि बोलणे अत्यंत सहज असते. त्यांच्या वागण्या-बोलण्यात मोकळेपणा असतो.
२. स्वतः संत असूनही सहसाधकांना विचारून कृती करणे
महाप्रसाद सिद्ध करतांना आमटी आणि भाजी यांमध्ये तिखट, मीठ, पाणी इत्यादी काही घालायचे असल्यास पू. रेखाताई आम्हा साधकांना ‘तिखट एवढे चालेल का ? पाणी अजून घालूया का ?’, असे अगदी सहजतेने विचारतात. त्यातून त्यांनी आम्हा साधकांच्या मनावर विचारून कृती करण्याचे महत्त्व बिंबवले आहे.
३. त्यांच्या वागण्या-बोलण्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच मोकळेपणा आणि निर्मळता आहे. त्यामुळे माझ्या मनातील त्यांच्याविषयीचा आदरभाव वाढला.
४. साधकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे
साधकांनी एखादी सेवा योग्य आणि विचारून केल्यावर पू. ताई त्या साधकांचे भरभरून कौतुक करतात. ‘सर्व सेवा शिकून घ्यायच्या आहेत’, असेही त्या आम्हाला सतत सांगतात. त्यांनी आम्हाला सतत शिकण्याच्या स्थितीत रहायला शिकवले.
५. साधकांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या काळजी घेणे
५ अ. एखाद्या साधकाला शारीरिक त्रास होत असेल, तर त्या त्याला जमेल तीच सेवा करायला सांगतात.
५ आ. एखाद्या साधकाच्या मनात अनावश्यक विचार येत असतील, तर पू. ताई त्याला योग्य दृष्टीकोन देतात.
५ इ. साधकांचे नामजपादी उपाय पूर्ण होण्याला प्राधान्य देणे : एकदा मी माझे नामजपादी उपाय पूर्ण न करताच सेवेला गेलो होतो. तेव्हा पू. रेखाताईंनी मला विचारले, ‘‘नामजप पूर्ण झाला ना ?’’ त्यावर मी ‘नाही’, असे म्हणालो. तेव्हा पू. ताईंनी मला त्वरित नामजपाला जाण्यास सांगितले. कितीही सेवा असल्या, तरी पू. ताई साधकांना आधी नामजपादी उपाय करण्यास सांगतात.
६. पू. रेखाताईंच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
६ अ. पू. रेखाताईंनी सांगितलेली सेवा करतांना ‘त्यांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवच सूक्ष्मातून समवेत आहेत’, याची अनुभूती येणे : एकदा मला शक्तीरथामधील (वाहनामधील) साहित्य उतरवण्याची सेवा होती. मला ‘ही सेवा जमेल कि नाही ?’, असे वाटत होते. तेव्हा मी ‘पू. ताईंनी मला ही सेवा करण्यास सांगितली आहे, तर त्याच माझ्याकडून ती सेवा करून घेणार आहेत’, असा भाव ठेवला. त्यानंतर मला ‘पू. रेखाताईच माझ्याकडून सेवा करून घेत आहेत’, असे तीव्रतेने जाणवले. ‘पू. रेखाताईंच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवच सूक्ष्मातून माझ्या समवेत आहेत’, याची अनुभूतीही मला घेता आली. त्यामुळे मला ‘सेवा कधी संपली ?’, हेही कळले नाही.
६ आ. पू. रेखाताईंनी हाक मारल्यावर त्यांच्या वाणीतील चैतन्यामुळे अनिष्ट शक्तीचे आवरण नष्ट होऊन सेवा करण्यासाठी ऊर्जा मिळणे : एकदा मला सेवा करतांना थोडा त्रास होत असल्यामुळे सेवा करायला जमत नव्हती. तेव्हा अकस्मात् पू. रेखाताईंनी मला हाक मारली आणि त्या क्षणी मला माझ्याभोवती आलेले अनिष्ट शक्तीचे आवरण दूर झाल्यासारखे वाटले. मला सेवा करण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा मिळाली आणि त्यानंतर माझी सेवा भावपूर्ण झाली.
६ इ. स्वतःला होणार्या आध्यात्मिक त्रासाविषयी पू. रेखाताईंना सांगितल्यावर त्रास बंद होणे : मध्यंतरी मला झोपेत भयंकर आणि विचित्र स्वप्ने पडायची. त्यामुळे मी झोपेतून खडबडून उठायचो. तेव्हा मी पुष्कळ घाबरलेला असायचो. असे ४ दिवस चालू होते. हे सर्व मी पू. रेखाताईंना सांगितले. त्यानंतर मला विचित्र स्वप्ने पडणे पूर्णपणे थांबले. यावरून ‘आपण संतांना कोणतीही गोष्ट किंवा अडचण आत्मनिवेदन स्वरूपात सांगितल्यावर त्याचा आपल्याला आध्यात्मिक दृष्टीने लाभ होतो’, असे माझ्या लक्षात आले. मला ‘संत हे आपले गुरुच आहेत’, याची अनुभूतीही घेता आली.
६ ई. पू. रेखाताई स्वयंपाकघरात नसतांना त्यांना प्रार्थना केल्यावर सूक्ष्मातून त्यांचे अस्तित्व अनुभवता येऊन सेवेतील आनंद मिळणे : एकदा मी स्वयंपाकघरात सेवा करत होतो. तेव्हा पू. रेखाताई एका सत्संगाला गेल्या होत्या. त्या स्वयंपाकघरात नसल्यामुळे ‘आता सेवा कशी होईल ?’, असे मला वाटू लागले. तेव्हा माझ्याकडून पू. रेखाताईंना प्रार्थना झाली, ‘तुम्हीच आमच्याकडून सेवा करून घ्या.’ त्यानंतर मला सेवा करतांना पू. रेखाताईंचे सूक्ष्मातून अस्तित्व अनुभवता येऊ लागले. ‘त्या सूक्ष्मातून सतत आमच्या समवेत आहेत आणि आम्हा साधकांकडून सेवा करून घेत आहेत’, असे जाणवून मला आनंद मिळत होता.
६ उ. पू. रेखाताईंना नमस्कार करतांना त्यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अस्तित्वाची अनुभूती येऊन भावजागृती होणे : मी पू. रेखाताईंना नमस्कार केल्यावर माझी भावजागृती होते. त्यांच्यामध्ये मला श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अस्तित्वाची अनुभूती येते. ‘पू. रेखाताई आणि प.पू. गुरुदेव वेगळे नसून एकच आहेत’, असे मला जाणवते.
७. कृतज्ञता
‘परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेने मला पू. रेखाताईंच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यांचा अनमोल सत्संग लाभला’, याबद्दल मी गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. शार्दुल चव्हाण (वय २० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०२२)
|