मुंबई – न्यायालयाने खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. मुंबईतील गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत गेल्या ५० दिवसांपासून कारागृहात आहेत. १९ सप्टेंबर या दिवशी त्यांचा जामीन अर्ज आणि कोठडी यांविषयी एकत्रित सुनावणी पार पडली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ४ दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. १ सहस्र ३९ कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा संचालनालयाने केला आहे. या आरोपपत्राची न्यायालयाने नोंद घेतली; परंतु आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही, असे राऊत यांच्या अधिवक्त्याने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्यांना आरोपपत्र देण्याचे निर्देश देत राऊत यांच्या कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करत असल्याचे स्पष्ट केले.