१. प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. जीजी रागावून विश्रांतीला जातील, या उद्देशाने त्यांच्याशी भांडण करणे
१ अ. प.पू. भक्तराज महाराज यांनी भंडार्याच्या वेळी प.पू. जीजींना पुष्कळ रागावून ‘माझ्या दृष्टीसमोर येऊ नकोस’, असे म्हणणे आणि त्याचा राग येऊन प.पू. जीजी निघून जाणे : ‘एकदा आम्ही ९ फेब्रुवारीच्या भंडार्याला इंदूरला गेलो होतो. बहुधा आमचा तो प.पू. बाबांकडील (प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडील) पहिलाच भंडारा असावा. दुसर्या दिवशी दुपारी जेवणावळी चालू होत्या. प.पू. जीजी (प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी) काहीतरी कारणाने प.पू. बाबांच्या खोलीत गेल्या होत्या. बोलता बोलता त्या दोघांचे भांडण चालू झाले. नेहमीप्रमाणे प.पू. बाबांचे शिव्या देणेही चालू झाले. ते प.पू. जीजींना वाट्टेल तसे बोलले आणि ‘तू येथून चालायला लाग. माझ्या दृष्टीसमोर येऊ नकोस’, असे बोलले. तेव्हा मी त्यांच्या खोलीच्या बाहेरच उभी होते. प.पू. जीजी प.पू. बाबांच्या खोलीतून रागारागाने बाहेर येऊन आपल्या खोलीत गेल्या. संतापाच्या भरात त्यांनी खरोखरच आपली ‘बॅग’ भरली आणि त्या तेथून निघून गेल्या.
१ आ. प.पू. बाबांचा पत्नीवरील प्रीतीचा तो आश्चर्यकारक आविष्कार पाहून अवाक् होणे : हा सगळा प्रकार मी सुन्न होऊन पहात होते. माझ्या मनात मोठा विकल्प आला, ‘हे सत्पुरुष असून त्यांनी आपल्या पत्नीचा असा चारचौघांत अपमान का केला ?’, या विचारांनी मी अस्वस्थ झाले. नंतर ५ मिनिटांतच प.पू. बाबांनी मला हाक मारली. ते मला म्हणाले, ‘‘त्याचे काय आहे कुंदाताई, मी त्यांना जाणीवपूर्वकच येथून घालवले. मी त्यांना चांगल्या प्रकारे सांगितले असते, तर त्यांनी माझे ऐकले नसते. त्या काम करून पुष्कळ थकल्या आहेत. त्यांच्या पोटर्या आणि पाय पुष्कळ दुखत आहेत. त्या इथेच राहिल्या असत्या, तर कामे करतच राहिल्या असत्या आणि रुग्णाईत (आजारी) झाल्या असत्या; म्हणून मी जाणीवपूर्वक भांडण काढून त्यांना घालवले.’’ मी अवाक् होऊन त्यांच्याकडे बघतच राहिले. प.पू. बाबांचा प.पू. जीजींवरील प्रेमाचा तो अजब आविष्कार मी अजूनही विसरू शकत नाही !
२. कांदळी येथे प.पू. बाबांनी प.पू. जीजींचा राग शांत करण्यासाठी आम्हाला त्यांच्या साहाय्यासाठी पाठवणे
२ अ. इंदूर येथील उन्हाळा सोसवत नसल्यामुळे प.पू. बाबा कांदळी येथे येऊन शेतातील घरी रहाणे : तशाच प्रकारचा एक प्रसंग काही वर्षांनी कांदळीला घडला. प.पू. बाबांचा अमृत महोत्सव झाल्यानंतर प.पू. बाबा रुग्णाईत होते. त्यांनी आम्हाला मुंबईहून इंदूरला बोलवून घेतले. इंदूरचा उन्हाळा त्यांना सहन होत नव्हता; म्हणून आम्ही सर्व जण कांदळीला आलो आणि तेथील सहा एकर शेतातील घरी राहिलो. त्या वेळी प.पू. जीजी कांदळी येथील श्रीराममंदिरात रहात होत्या.
२ आ. प.पू. बाबांना भेटायला प.पू. जीजी खोलीत जाणे, कुणीतरी खोलीत आल्याची चाहूल लागल्यावर प.पू. बाबांनी रागावणे आणि त्यामुळे दोघांचे कडाक्याचे भांडण होऊन प.पू. जीजींनी चिडून निघून जाणे : पाडव्याच्या आदल्या दिवशी प.पू. जीजी कांदळीच्या श्रीराममंदिरातून सहा एकरला प.पू. बाबांना भेटायला आल्या. त्या वेळी प.पू. बाबा झोपले होते. त्यांना खोलीत कुणीतरी आल्याची चाहूल लागली. ‘दुसर्या कुणी बाई न विचारताच आत आल्या आहेत’, असे वाटून त्यांनी शिव्या द्यायला चालू केले. त्याबरोबर प.पू. जीजीही चिडल्या आणि दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. जातांना प.पू. जीजी आम्हा सगळ्यांना उद्देशून म्हणाल्या, ‘‘हो, तुम्ही इथे मजा मारा, चांगले-चुंगले करून खा. आमची कोण पर्वा करतो ? कुणाला काही पडलेले नाही.’’ (मी दोनच दिवसांपूर्वीच मुंबईला जाऊन आले होते आणि येतांना ओले काजू घेऊन आले होते. सहा एकरच्या शेतातून नवीन कांदेही आले होते. काजू आणि कांदे-बटाटे यांची मसालेदार भाजी चुलीवर शिजत होती. मी चुलीपाशी बसले होते; म्हणून मला बघून त्या तसे बोलल्या.)
२ इ. पाडव्याच्या दिवशी पुष्कळ मंडळी जेवायला येणार असल्यामुळे प.पू. बाबांनी प.पू. जीजींच्या साहाय्यासाठी श्रीराममंदिरात पाठवणे, तेव्हा ‘प.पू. जीजी रागावणार’, असे वाटणे आणि त्यांचा राग शांत झाल्यावर उरलेल्या पुरणपोळ्या करून त्यांना साहाय्य करणे : दुसर्या दिवशी पाडवा होता. सकाळी उठल्या उठल्या प.पू. बाबांनी मला बोलावले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही आणि देशपांडेबाई (प.पू. बाबांना भेटण्यासाठी प.पू. काणे महाराज यांचे शिष्य श्री. देशपांडे आणि त्यांच्या पत्नी कांदळीला आले होते.) आवरून श्रीराममंदिरात जा. त्यांना (प.पू. जीजींना) जे काही साहाय्य लागेल ते करा.’’ आम्ही दोघी आवरून श्रीराममंदिरात गेलो आणि घाबरत घाबरतच स्वयंपाकघराच्या दारापाशी उभ्या राहिलो. आता ‘प.पू. जीजी आपल्याला ओरडणार’, याची आम्हाला खात्री होती आणि झालेही तसेच. आम्हाला पाहून त्या ‘‘कशाला आलात ? निघून जा. तुमची काही आवश्यकता नाही’’, असे ओरडल्या. सौ. स्मिता (प.पू. बाबांची सून) आणि सौ. शकुुंतलाकाकी दळवी या दोघी स्वयंपाकघरात होत्या. त्या दोघींनी आम्हाला डोळ्यांनी खुणावून थांबायला सांगितले. थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर प.पू. जीजींनी आम्हाला आत बोलावले. तोपर्यंत त्यांच्या नैवेद्यापुरत्या पुरणपोळ्या झाल्या होत्या. उरलेल्या सगळ्या पोळ्या आम्ही दोघींनी केल्या. संध्याकाळी बरीच मंडळी जेवायला आणि नववर्षाच्या कार्यक्रमासाठी येणार होती.
या प्रसंगांतून पुन्हा एकदा प.पू. जीजींवरील प.पू. बाबांच्या प्रेमाचा अजब नमुना बघायला मिळाला !’
– डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले
(संदर्भ : ‘सनातनचा ग्रंथ ‘अमृतमय गुरुगाथा : खंड २ – गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या अगम्य लीला आणि शिकवण’)