‘वारकर्‍यांचा जाणता राजा’, असे म्हणत ठाणे येथील वारकर्‍यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार !

मुख्यमंत्र्यांचा तातडीने साहाय्य करण्याचा प्रयत्न

ह.भ.प. शिवाजी महाराज बुधकर

ठाणे, १८ सप्टेंबर (वार्ता.) – येथील वारकरी ह.भ.प. शिवाजी महाराज बुधकर हे हरिद्वार आणि बद्रीनाथ भागात यात्रेला गेले असता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. यात ह.भ.प. बुधकर महाराज आणि त्यांच्या ४ साथीदारांचे निधन झाले. त्यांच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर आणि वारकरी बांधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी साहाय्य मागितले. मुख्यमंत्र्यांनी कसलाही विलंब न करता त्यांचे पार्थिव विमानाने आणण्यासाठी साहाय्य केले. ‘येथील समस्त वारकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या साहाय्यासाठी ‘वारकर्‍यांचा जाणता राजा’ असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली आहे’, असे विश्व हिंदु परिषदेच्या कोकणप्रांत विभागातील ठाणे येथील पदाधिकारी ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर यांनी कळवले आहे.

‘स्वतः मृदंग वाजवून अत्यंत सुमधुर आवाजात आणि कमी वेळेत चाल म्हणून संपूर्ण वारकरी संप्रदायात आदर्श घालून देणारा एक सेवानिष्ठ गुणवंत वारकरी’ म्हणून ह.भ.प. शिवाजी महाराज बुधकर यांची ओळख आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण वारकरी संप्रदायात शोक व्यक्त होत आहे.