प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या प्रकरणी महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप !

वेदांत समूह आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून निर्माण होणार आहे प्रकल्प

मुंबई – वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून महाराष्ट्रात होणारा १ लाख ६६ सहस्र कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याचा निर्णय या उद्योगसमूहाने घेतला आहे. गुजरात राज्यातील कर्णावतीजवळील ढोलेरा येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रात होऊ घातलेला हा प्रकल्प अचानक गुजरातमध्ये गेल्याप्रकरणी महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालू केले आहेत.

अ. १३ सप्टेंबर या दिवशी वेदांत समूहाने हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार असल्याचे घोषित केले. हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे या प्रकल्पाला पूरक असलेले उद्योग, लाखो तरुणांचा रोजगार, कोट्यवधी रुपयांचा कर यांना महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे, अशी टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली आहे.

आ. गुजरात सरकारने या प्रकल्पासाठी १ सहस्र एकर भूमी विनाशुल्क देऊ केली आहे, तसेच वीज आणि पाणी सवलतीच्या दरात आणि २० वर्षांसाठी एकाच दराने देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीच्या काळात प्रतिसाद न दिल्याने प्रकल्प गेला ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री झाल्यानंतर मी वेदांत समुहाचे मालक अनिल अग्रवाल यांच्यासमवेत बैठक घेतली होती. तळेगाव येथे या प्रकल्पासाठी १ सहस्र १०० एकर भूमी आम्ही देऊ केली होती. ३३ ते ३५ सहस्र कोटी रुपयांच्या सवलती आम्ही या प्रकल्पासाठी दिल्या होत्या; मात्र मागील २ वर्षे त्यांना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळायला हवा होता, तो न्यून पडला असावा. आमच्या सरकारने त्यांना पूर्णपणे सवलती देऊ केल्या होत्या.

प्रकल्पाविषयी माहिती !

तैवान देशातील फॉक्सकॉन आस्थापनाशी भागिदारी करून वेदांत समूह महाराष्ट्रात हा प्रकल्प उभारणार होता. १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले ‘डिस्प्ले फॅब्रिकेशन’, ६३ सहस्र कोटी रुपये गुंतवणुकीचे ‘सेमी कंडक्टर्स’, तसेच ३ सहस्र ८०० कोटी रुपयांचा चाचणी प्रकल्प अशी या प्रकल्पाची व्याप्ती आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात ३ टप्प्यांमध्ये उभारण्यात येणार होता. हा प्रकल्प उभारण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात तळेगाव, तर विदर्भ येथे बुटीबोरी असे २ पर्याय देण्यात आले होते. या प्रकल्पाच्या सादरीकरणाच्या वेळी या प्रकल्पातून २ लाख जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असे सांगण्यात आले होते. महाविकास आघाडीची सत्ता असतांना महाराष्ट्रात हा प्रकल्प उभारण्याविषयीची प्राथमिक चर्चा चालू होती.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलै मासात ‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ या आस्थापनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याची चर्चा चालू असतांना कोट्यवधी रुपयांचा हा प्रकल्प अचानकपणे गुजरातमध्ये गेल्याच्या कारणामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झाला आहे.