वास्को, १२ सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यात मराठीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची गोव्यात काम करण्याची सिद्धता आहे. गोवा सरकारने अनुमती दिल्यास महाराष्ट्र सरकारकडून वाचनालयांना मराठी पुस्तकांसाठी अनुदान, साहित्य संमेलनांच्या आयोजनासाठी अनुदान, मराठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करणे आदी कामे करण्याची सिद्धता आहे, अशी ग्वाही महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मंत्री दीपक केसरकर ११ सप्टेंबरला दाबोळी विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.
(सौजन्य : Prudent Media Goa)
ते पुढे म्हणाले,
‘‘गोव्यात मराठी भाषा फार पूर्वीपासून आहे. मराठी ही गोव्याची राजभाषा आहे आणि तसा कायद्यातही उल्लेख आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी मराठी बोलली किंवा लिहिली जाते, तेथे मराठीचे जतन आणि संवर्धन करणे हे महाराष्ट्र सरकारचे दायित्व आहे. गोवा हे निराळे राज्य असल्याने मराठीचे जतन आणि संवर्धन यांसाठी गोवा सरकारने अनुमती दिल्यास तसे करण्याची महाराष्ट्र सरकारची सिद्धता आहे. मराठी संस्थांना काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची अनुदान योजना आहे. या योजनेचा विस्तार गोव्यातही करता येऊ शकतो; मात्र त्यासाठी गोवा सरकारची अनुमती लागेल. मुंबई-गोवा किनारी महामार्गाचे काम लवकरच चालू केले जाणार आहे. या महामार्गामुळे गोवा-मुंबई अंतर ७ ते ८ घंट्यांनी उणावणार आहे. सध्या चालू असलेल्या चौपदरी महामार्गाव्यतिरिक्त किनारी मार्गाचे काम हाती घेतले जाणार आहे.’’