आमदार टी. राजा सिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा पुरवावी ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

खामगाव, अकोला आणि नाशिक येथे निवेदन !

डावीकडून तहसीलदार अतुल पाटोळे, उजवीकडे हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय खोत, सौ. प्रीती नागपुरे

खामगाव, ७ सप्टेंबर (वार्ता.) – भाग्यनगर (तेलंगाणा) येथील गोशामहलचे आमदार टी. राजा सिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा देण्यात यावी आणि त्यांना ठार मारण्याची धमकी देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खामगाव येथील हिंदुत्वनिष्ठांकडून सरकारकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील हिंदु जनजागृती समितीचे निवेदन खामगाव येथील तहसीलदार अतुल पाटोळे यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय खोत, सौ. प्रीती नागपुरे उपस्थित होत्या.

आमदार टी. राजा सिंह यांचे घर जाळण्याची धमकी देणारे काँग्रेसचे सचिव राशिद खान, रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांची हत्या करण्यासाठी मुसलमानांना चिथावणी देणारा कलिमुद्दीन, मुसलमानांना भडकावणारा काँग्रेसचा नेता फिरोज खान आदींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तेलंगाणा सरकार पक्षपाती असल्यामुळे टी. राजा सिंह यांना न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांच्या वरील खटले महाराष्ट्र, कर्नाटक किंवा गोवा राज्यात हस्तांतरित करण्यात यावेत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

नाशिक – गोशामहल (तेलंगाणा) येथील आमदार टी. राजा सिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा पुरवा आणि त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देणार्‍यांवर कठोर कारवाई करा या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांचे स्वीय साहाय्यक यांना देण्यात आले. या प्रसंगी सर्वश्री गौरव जमधडे, डॉ. राहुल पाटील, पराग भुरे, अधिवक्त्या प्रेरणा हेगडमल, विहिंपचे कैलास देशमुख, उद्योजक संदीप वाघ यांसह अन्य उपस्थित होते.

निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

अकोला –  या संदर्भातील हिंदु जनजागृती समितीचे निवेदन अकोला येथील जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने अधीक्षक श्रीमती पागोरे यांनी स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय खोत, अधिवक्त्या (श्रीमती) श्रुती भट, रणरागिणी शाखेच्या सौ. अश्विनी सरोदे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अकोला विभागप्रमुख प्रा. हरिदास ठाकरे, धर्मप्रेमी श्री. संजय केंदळे उपस्थित होते.

हिंदु एकता मंचच्या वतीने टी. राजा सिंह ठाकूर यांची अन्यायपूर्वक अटकेतून मुक्तता करून त्यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी वेगळ्या निवेदनाद्वारे करण्यात आली.