सीवूड्स येथील ‘बेथेल गॉस्पेल चर्च’च्या पाद्रयाने आणखी ३ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार !

‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या चर्चमध्ये विनाअनुमती बालगृह चालवणारा पाद्री (पास्टर) राजकुमार येशुदासन

नवी मुंबई : सीवूड्स येथील ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या चर्चमध्ये विनाअनुमती बालगृह चालवणारा पाद्री (पास्टर) राजकुमार येशुदासन याने आणखी ३ मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी स्वत: एन्.आर्.आय. पोलीस ठाण्यात येशुदासन याच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या आणखी ३ तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत. या तक्रारींवरून ३ स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामुळे ‘चर्चद्वारे चालवण्यात येणार्‍या बालगृहामध्ये कुणाचेही लैंगिक शोषण झाले नाही’, असे पत्रकार परिषद घेऊन सांगणार्‍या ए.आर्.के. फाऊंडेशनचा दावा फोल ठरला आहे.

१. यापूर्वी चर्चमधील बालगृहातून सुटका करण्यात आलेल्या एका १४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या महिला अधिकार्‍यांनी ऑगस्ट मासामध्ये एन्.आर्.आय. पोलीस ठाण्यात येशुदासन याच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. त्यामुळे येशुदासन विरोधात आता या प्रकरणात विनयभंग आणि पोक्सो कलमानुसार एकूण ४ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

२. ऑगस्ट मासामध्ये जिल्हा बाल संरक्षण समितीने या चर्चवर धाड टाकून ४५ अल्पवयीन मुलांची सुटका केली. यामध्ये १३ मुलींचा समावेश होता. तेव्हापासून येशुदासन अटकेत आहे.

३. या प्रकरणी महिला आणि बाल विकास विभागाने केलेल्या अधिक अन्वेषणामध्ये पाद्री येशुदासन याने लैंगिक शोषण केल्याची माहिती आणखी ३ अल्पवयीन मुलींनी दिली. यामध्ये १३ आणि १४ वर्षीय २ बहिणींचा समावेश असून त्या राजस्थान येथील आहेत.

४. तसेच एका १० वर्षीय मुलीनेही अशाच प्रकारची माहिती दिली. शहरात वसतीगृह, बालगृह चालवण्यासाठी शासनाकडून अनुमती घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन रेड्डी यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

प्रसारमाध्यमे अशा बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी का देत नाहीत ? एखाद्या हिंदु संतांवर अशा प्रकारे खोटे आरोप झाले असते, तर एव्हाने ही बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दाखवली गेली असती !