टिकली न लावता श्री गणेशाचे स्वागत करणार्‍या अभिनेत्रीच्या विज्ञापनास आक्षेप !

सई ताम्हणकर यांच्या विज्ञापनाला शेफाली वैद्य यांचा विरोध !

छायाचित्र सौजन्य : सकाळ

मुंबई – गणेशोत्सवाच्या औचित्यावर ‘रिलायन्स मार्ट’च्या वतीने करण्यात आलेल्या एका विज्ञापनाला विरोध होत आहे. ‘रिलायन्स मार्ट’च्या विज्ञापनात मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने टिकली न लावता श्री गणेशाचे स्वागत केल्याचे दाखवण्यात आले आहे. याला ज्येष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी आक्षेप घेतला आहे. याविषयी त्यांनी एक ट्वीट केले असून त्यासमवेत ‘#nobindinobusiness’ असा ‘हॅशटॅग’ लावला आहे. (‘रिलायन्स मार्ट’ विज्ञापनाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून इतरांनाही या विज्ञापनाला विरोध करण्यास सांगणार्‍या आणि धर्महानी रोखण्यासाठी आवाज उठवणार्‍या ज्येष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांचे अभिनंदन ! यातून इतर मराठी आणि हिंदी कलाकारांनी बोध घेऊन अनेक माध्यमातून होणारे हिंदूंच्या देवता आणि सण यांचे विडंबन टाळावे !- संपादक)

काय आहे प्रकरण ?

वर्ष २०२१ च्या दीपावली सणाच्या काळात काही मोठ्या ‘ब्रँड’नी त्यांच्या विज्ञापनासाठी बिंदी न लावलेल्या मॉडेल्सची छायाचित्रे विज्ञापनासांसाठी वापरली होती. त्यावर शेफाली वैद्य यांनी आक्षेप घेत ‘हिंदूंच्या सण-उत्सवांच्या विज्ञापनांमध्ये वापरण्यात येणार्‍या ‘मॉडेल्स’नी (‘एखाद्या विशिष्ट आस्थापनाने बनवलेले कपडे अथवा अन्य साहित्य यांचा प्रसार करण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीने) ‘बिंदी’ (टिकली) लावलीच पाहिजे’, अशी आग्रही भूमिका घेतली होती. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेला सर्व स्तरांमधून मिळणारा मोठा पाठिंबा लक्षात घेऊन अखेर संबंधित सर्व आस्थापनांनी जुने विज्ञापन मागे घेत बिंदी लावलेले नवीन विज्ञापन प्रसिद्ध केले होते. त्यामुळे मोठमोठे आस्थापन आणि ब्रँड्स यांना मेटाकुटीला आणणार्‍या शेफाली वैद्य आता ‘रिलायन्स मार्ट’ विज्ञापनाच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत.

संपादकीय भूमिका 

अरब देशातील कोणत्याही आस्थापनांनी महंमद पैगंबर आणि कुराण यांचे विज्ञापनातून विडंबन केल्यास संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करून त्या आस्थापनाला देशातून हद्दपार केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून देशातील विविध आस्थापनांकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. याविषयी महाराष्ट्र सरकारने लक्ष देऊन संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !