उज्जैन येथील हरसिद्धीदेवीच्या चरणी सामूहिक प्रतिज्ञेने मध्यप्रदेशात अभियानाला प्रारंभ !

हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’

उज्जैन (मध्यप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त देशभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. मध्यप्रदेशमध्ये शक्तिदात्री हरसिद्धीदेवीच्या चरणी सामूहिक प्रतिज्ञा करून या अभियानाला प्रारंभ करण्यात आला.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना करतांना धर्मप्रेमी

प्रारंभी हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांनी हरसिद्धीदेवीच्या चरणी सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात समितीचे सदस्य आणि उपस्थित भाविक यांच्यासमवेत सामूहिक प्रतिज्ञेचा कार्यक्रम झाला. २ मास चालणार्‍या या अभियानाच्या अंतर्गत मंदिरामध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करणे, मंदिर स्वच्छता करणे, समाज जागृतीसाठी व्याख्याने घेणे, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार उज्जैन येथील विविध मदिरांमध्येही अशी प्रार्थना करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी समितीच्या वतीने हरसिद्धीदेवी प्रबंधन समितीचे आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश तथा राजस्थान समन्वयक सर्वश्री आनंद जाखोटिया, तसेच श्रीराम काणे, शैलेंद्र सेठ, विजय जोशी, शिवाजीराव शिंदे, शैलेंद्र सेठिया, पंडित रामेश मेहता आदी मान्यवर आणि भाविक गण उपस्थित होते.

मंदिराच्या प्रांगणात करण्यात आलेली सामूहिक प्रतिज्ञा !

१. मी स्वत: हिंदु संस्कृती, परंपरा, सण-उत्सव यांची जोपासना, आचरण आणि प्रसार करीन, तसेच याविषयी माझ्या धर्मबंधूंमध्ये जागृती करीन.

२. हिंदु धर्म, वेदादी धर्मग्रंथ, देवालय, गोमाता आणि स्त्री यांचे रक्षण करणे माझे प्रथम कर्तव्य आहे.

३. ‘धर्मनिरपेक्ष’ भारताला परत ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र’ करणे, तसेच त्याला आदर्श, सुखी, समृद्ध, संपन्न, सुरक्षित आणि सुसज्ज बनवणे, हेच माझ्या जीवनाचे ध्येय असेल.