चीनच्या शिनजियांगमध्ये मुसलमानांचा छळ होत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून उघड

चीनने आरोप फेटाळला !

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – चीनमधील शीनजियांग प्रांतात मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या संदर्भात संयुक्त राष्ट्रांनी एक अहवाल प्रसिद्ध केला असून यात येथील मुसलमानांचा गंभीर स्वरूपाचा छळ करण्यात येत आहे, असे म्हटले आहे. ‘हा प्रकार मानवतेच्या विरोधात गुन्हा आहे’, असेही या अहवालात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त मीशेल बॅचलेट यांचा ४ वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी जिनिव्हामधील परिषदेत बुधवारी रात्री हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. हा अहवाल बनण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला. बॅचलेट यांचा कार्यकाळ संपण्याच्या अवघ्या १३ मिनिटांआधी मानवाधिकार उल्लंघनाचा हा अहवाल परिषदेसमोर ठेवण्यात आला. ‘चीनकडून शिनजियांग प्रांतातील सुमारे १० लाख उघूर मुसलमानांना कह्यात घेऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत आहे’, असा आरोप आहे. हे आरोप खरे आहेत, असे या अहवालातून निष्पन्न झाले आहे. दुसरीकडे शीनजियांग प्रांतात मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचा आरोप चीनने फेटाळला आहे. या प्रांतात कट्टरतावाद्यांना आवर घालण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र चालवण्यात येत असल्याचे चीनने म्हटले आहे.

बॅचलेट यांनी सांगितले की, शिनजियांग प्रांतातील समस्या भीषण आहेत. या समस्या राष्ट्रीय स्तरावरील उच्चपदस्थ आणि प्रादेशिक अधिकार्‍यांकडे ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत. शिनजियांगमधील उइगर स्वायत्त प्रदेशातील परिस्थितीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन बॅचलेट यांनी संयुक्त राष्ट्रांला केले आहे.

संपादकीय भूमिका

आता संयुक्त राष्ट्रे चीनला यविषयी जाब विचारून मुसलमानांचा होत असलेला छळ थांबवण्याचे धाडस दाखवतील का ?