कारागृहातील बंदीवानांची संख्या अल्प करण्यासाठी ‘रिलीज यू.टी.आर्.सी. @ ७५’ हा उपक्रम राबवणार !

पुणे – राज्यातील कारागृहातील बंदीवानांची संख्या अल्प करण्यासाठी ‘रिलीज यू.टी.आर्.सी.(अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी) @ ७५’ हा उपक्रम राबवला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत येरवडा कारागृहामधून ४१८ कच्च्या बंदीवानांची सुटका केली आहे. ‘राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणा’च्या वतीने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. कारागृहात कच्चे बंदीवान अधिक दिवस राहू नयेत, तसेच तरुण कैदी कारागृहात न रहाता त्यांचे पुनर्वसन करता येण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी १६ निकष निश्चित केले असून त्यामध्ये प्रामुख्याने फौजदारी दंड संहिता, सी.आर्.पी.सी. कलम ४३६ आणि ४३६ अचा अंतर्भाव केला आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख, यू.टी.आर्.सी. कमिटीचे प्रमुख ए.एस्. वाघमारे (जिल्हा न्यायाधीश), पुणे जिल्हा विधी प्राधिकरण सचिव मंगल कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा कारागृहात हा प्रकल्प राबवला. ४७ अधिवक्त्यांच्या गटाने २८ दिवसांत हे काम पार पाडले. कारागृह अधीक्षक आणि वरिष्ठ तुरुंग अधिकारी यांनी प्रकल्पासाठी साहाय्य केले.

संपादकीय भूमिका 

कारागृहातील बंदीवानांची संख्या अल्प करण्यासाठी उपक्रम राबवण्यासमवेत गुन्हेगार निर्माण होऊ नयेत, यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे, हाच एकमेव उपाय आहे.