रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी रुग्णालय सल्लागार समिती गठीत करणार ! – मुख्यमंत्री

मुंबई, २५ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ ‘रुग्णालय सल्लागार समिती’ गठीत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिली. अधिवेशनाच्या कालावधीत विधीमंडळाच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न करणारे सुभाष देशमुख यांच्या उपचाराविषयी औचित्याचे सूत्र सभागृहात उपस्थित करतांना रुग्णालयातील दुरवस्थेची माहिती दिली. या वेळी अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी रुग्णालय समिती गठीत करण्याचे निर्देश शासनास दिले. यावर एकनाथ शिंदे यांनी ही समिती स्थापन करण्याची घोषणा केली.

या वेळी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मुंबईतील रुग्णालयांत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना बसण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता यांविषयीच्या समस्या  सोडवण्यासाठी सल्लागार समिती कार्य करेल. या समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश असेल. सुभाष देशमुख यांच्या उपचारात कसूर केली जाणार नाही.’’