‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले गुरुरूपात भेटल्यामुळे जीवन सार्थकी लागले’, या भावाने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणार्‍या सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे (वय ७४ वर्षे) !

श्रावण कृष्ण पंचमी (१६.८.२०२२) या दिवशी सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) पाठवलेले पत्र पुढे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे यांच्या चरणी ७४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. (सौ.) शैलजा परांजपे

गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले),

माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या चरणी माझा शिरसाष्टांग नमस्कार !

गुरुदेवा, श्रावण कृष्ण पंचमी, म्हणजे १६.८.२०२२ या दिवशी माझा ७४ वा वाढदिवस आहे; म्हणून ‘या लिखाणाच्या माध्यमातून तुमच्याशी ४ शब्द बोलावेत’, असे मला वाटले.

१. ‘साधनेत येऊन २२ वर्षे होऊनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी साधना केली नाही’, अशी खंत वाटणे

गुरुदेवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), ‘आज माझ्या वयाची ७४ वर्षे पूर्ण झाली आणि मी साधनेत येऊन २२ वर्षे पूर्ण झाली; पण ‘इतक्या वर्षांत आपण काहीच साध्य केले नाही. माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित असे काहीच झाले नाही’, याची माझ्या मनाला खंत वाटते.

२. लहान वयात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले न भेटल्याचे दुःख होणे

देवा (गुरुदेवा), माझ्या बालपणापासून साधनेला प्रारंभ करेपर्यंतची ५३ वर्षे व्यर्थच गेली. ‘तुम्ही मला लहानपणीच भेटला नाहीत’, याचे मला वाईट वाटते. माझ्या जीवनात अनंत घडामोडी घडल्या; पण गुरुदेवा, ‘त्या वेळी तुम्ही न भेटल्यामुळे मला त्यातून शिकता आले नाही’, याचे आता मला वाईट वाटते.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आश्रमात रहाणारे बालसाधक लहान वयातच साधना शिकून आध्यात्मिक प्रगती करत असणे

सनातनच्या आश्रमातील बालसाधक लहानपणापासून शालेय शिक्षण घेत असतांनाच तुमच्या मार्गदर्शनानुसार साधनेची सर्व अंगे आत्मसात् करतात. ते आपल्याकडून प्रतिदिनच्या जीवनात ‘इतरांशी कसे बोलावे ? कसे वागावे ? साधना कशी करावी ? संगीत, नृत्य, वादन इत्यादी विविध कलांच्या माध्यमातून देवापर्यंत कसे पोचावे ?’, हे सर्व शिकतात. तुम्ही त्यांना ‘हिंदु राष्ट्राच्या (रामराज्याच्या) स्थापनेसाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी ज्ञान देता. त्यामुळे ते बालसाधक व्यष्टी आणि समष्टी साधना शिकून आदर्श साधक होतात अन् जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून लवकर मुक्त होतात. तुम्हीच त्यांना संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु या पदांपर्यंत घेऊन जाता. गुरुदेवा, तुम्ही बालसाधकांना त्यांच्या बालवयातच भेटलात; म्हणूनच हे सगळे होत आहे.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रूपातील परमेश्वराला प्रत्यक्ष जवळून अनुभवता येणे

देवा, मी पुष्कळ संप्रदाय जवळून अनुभवले; पण आपल्यासारखे आपणच आहात ! ‘परमेश्वर परिपूर्ण, म्हणजे सर्व गुणांनी युक्त आहे’, असे आपण पोथ्या-पुराणांतून ऐकतो; पण आम्ही सनातनचे साधक आपल्या रूपातून त्या परमेश्वराला प्रत्यक्ष जवळून अनुभवत आहोत. तो आम्हाला ‘व्यष्टी आणि समष्टी साधना करून किंवा कलांच्या माध्यमातून देवापर्यंत कसे पोचायचे ?’, हे शिकवतो.

५. मनुष्याला संसाराच्या मायाजालातून मुक्त करण्याचे सामर्थ्य केवळ श्री गुरूंमध्येच असणे

देवा, प.पू. भक्तराज महाराज एका भजनात म्हणतात, ‘असा कसा मायाजाळाचा हा फंदा ।’ त्याप्रमाणे मी साधनेत येण्यापूर्वी वयाच्या ५३ व्या वर्षांपर्यत संसाराच्या मायाजालात अडकले होते. त्या मायाजालात मनुष्य एकदा अडकला की, तो त्यातून बाहेर येऊच शकत नाही. मनुष्याला मायाजालातून तारून नेण्यास केवळ श्री गुरुच समर्थ असतात. गुरु भेटले, तरच मनुष्याची मायेतून मुक्तता होते.

६. ‘आयुष्याच्या आरंभीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले भेटले असते आणि साधना कळली असती, तर स्वतःचा देह गुरुकार्यासाठी सार्थकी लावता आला असता’, असे वाटणे

गुरुदेवा, माझ्या आयुष्यात अनेक स्थित्यंतरे झाली आणि अनेक सुख-दुःखाच्या घडामोडी घडल्या. तेव्हा ‘हे सगळे प्रारब्धामुळे घडते, हे स्थुलातून सांगणारे आपण माझ्या जीवनात नव्हता’, याचे मला वाईट वाटते. संसारातील सर्व कर्तव्ये पार पाडण्यात आणि मायेतील सर्व व्यवहार सांभाळण्यात माझी पुष्कळ शारीरिक हानी झाली. नको त्या गोष्टींसाठी माझा देह झिजला. त्या वेळी ‘या सर्वांमधून आनंदप्राप्ती कशी करायची ? देवाशी अनुसंधान कसे साधायचे ?’, हे शिकवायला आपण मला भेटला नव्हता. तेव्हाच मला साधना कळली असती, तर आता जसे साधक स्वतःचा देह गुरुकार्यासाठी झिजवून सार्थकी लावतात, तसा माझा देहही सार्थकी लागला असता. माझे सर्व आयुष्य तन, मन आणि धन यांसह आपल्या चरणी समर्पित झाले असते.

७. वयाच्या ८० व्या वर्षीही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अविश्रांत कार्यरत असलेले पाहून मनाला उभारी मिळणे

देवा, आता माझा देह थकला. माझी शारीरिक क्षमता न्यून झाली; पण माझे मन मात्र व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी सारखे धडपडते. देवा, तुमची शारीरिक क्षमता अल्प असतांनाही तुम्ही आम्हा साधकांसाठी आणि हिंदु राष्ट्र, म्हणजेच रामराज्य येण्यासाठी अविश्रांत कार्यरत असता. तुमच्याकडे पाहिल्यावर ‘तुमच्या सेवेपुढे माझी सेवा शून्यच आहे’, असे मला वाटते. तुमचे कार्य बघून माझ्या मनाला उभारी येते.

८. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आईच असल्याने त्यांच्याकडे मन मोकळे केले जाणे

देवा, आता तुम्ही म्हणाल, ‘भूतकाळ आणि भविष्यकाळ आठवायचा नाही. वर्तमानात जगायचे !’, हे सगळे तुम्हाला ठाऊक असूनही तुमच्या मनात असे विचार का येतात ?’ हे सगळे मान्य आहे देवा ! माझे चुकतच आहे; पण मला क्षमा करा.  लेकरू आईला सर्व सांगते. तुम्ही माझी आईच आहात; म्हणून मला तुम्हाला मनातले सांगितल्याविना रहावत नाही.

९. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची भेट झाल्यावर साधनेला झालेला आरंभ !

९ अ. आयुष्यात ठरलेल्या वेळीच श्री गुरूंची भेट होणे : माझा प्रारब्धभोग संपल्याविना माझी तुमच्याशी भेट होणारच नव्हती. यावरून ‘माझे प्रारब्धभोग केवढे मोठे होते !’, हे माझ्या लक्षात आले. तुम्ही म्हणता, त्याप्रमाणे ‘जीवनात श्री गुरु भेटण्याची वेळ ठरलेली असते’ आणि तसेच झाले. माझी गुरुभेटीची वेळ आल्यावरच तुम्ही मला भेटलात. २२ वर्र्षांपूर्वी माझे पूर्वसंचित संपले आणि सनातन संस्थेच्या माध्यमातून माझी आपल्यासारख्या अलौकिक गुरूंशी भेट झाली.

९ आ. गुरूंच्या शिकवणीमुळे व्यष्टी आणि समष्टी साधना होऊ लागणे : माझ्या साधनेचा श्री गणेशा चालू झाला. हळूहळू आपल्या शिकवणीमुळे ‘या मायाबाजारात काहीही अर्थ नाही’, हे माझ्या लक्षात आले. देव माझ्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधना करवून घेऊ लागला. माझ्या देहाच्या क्षमतेनुसार माझ्याकडून समष्टी सेवा घडली; मात्र व्यष्टी साधना नित्यनेमाने आपल्याला अपेक्षित अशी होऊ लागली.

१०. कृतज्ञता

‘देवा, तुम्ही मला या सर्वांचे फळही दिलेत. तुम्ही मला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवून संतपदापर्यंत पोचवले. आपल्या चरणांजवळ आल्याने माझा जन्म सार्थकी लागला’, यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.

माझी मोठी मुलगी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा आमच्या सर्व कुटुंबाला साधनेच्या मार्गावर आणण्यात मोठा वाटा आहे; म्हणून मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.

११. प्रार्थना

‘गुरुराया, तुम्ही मला मायेतून सोडवून तुमच्या चरणांशी आणलेत’, यातच सर्वकाही आले. तुम्ही मला अपेक्षेपेक्षा अधिक दिलेत. ‘आता माझ्या पुढील आयुष्याचा प्रत्येक क्षण मला आपल्या कार्यासाठी वेचता येऊ दे. मला अखंड नामस्मरण, आनंद, भावावस्था आणि सेवा यांमध्येच रहाता येऊ दे. माझे पुढील आयुष्य आपल्या चरणी समर्पित होऊ दे’, अशी आपल्या चरणी मनोभावे प्रार्थना !’

– आपली,

(पू.) सौ. शैलजा परांजपे (वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.७.२०२२)