महायोगी अरविंद यांचे परमेश्वरप्राप्तीसाठीचे विचारधन आणि ते समाधीस्थ झाल्यावर त्यांच्याविषयी आलेली विलक्षण अनुभूती

महर्षि अरविंद यांची १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी १५० वी जयंती आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

महायोगी अरविंद घोष यांनी परमेश्वरप्राप्तीसाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी केलेले मार्गदर्शन, सांगितलेला उपासनेचा मार्ग आणि त्यांची उच्च आध्यात्मिक स्थिती यांविषयीची माहिती या लेखात देत आहोत.

महायोगी अरविंद घोष अर्थात महर्षि अरविंद

१. परमेश्वराशी गाठभेट होण्यापूर्वी मनुष्याने आत्मसंशोधन करून ‘मी कोण ?’ हे जाणून घेणे आवश्यक !

‘मन ही मोठी शक्ती आहे, यात वादच नाही. उच्च पातळीवर गेल्यानंतर खालच्या पातळीवरच्या शक्ती नष्ट होत नाहीत. त्या उत्क्रांत होतात किंवा विकसित होतात. माणूस परबोधावस्थेपर्यंत गेला, तरी तो बाहेरून दिसतो, तसाच राहील; पण तो पूर्णत: पालटलेला असेल. जसे जयंत नारळीकर, आईन्स्टाईन आणि एखादा रस्त्यावरचा माणूस हे दिसायला जवळजवळ सारखेच असतील; पण आईन्स्टाईन हा अंतरंगात तोच असेल अन् हा माणूस (ईश्वरी शक्तीच्या दृष्टीने) अंतरंगात कुणीच नसेल. त्याप्रमाणेच अवतारी पुरुष हेही दिसायला चारचौघांसारखे असतात; पण काही विलक्षण शक्ती घेऊन आलेले असतात. यासंदर्भात योगी अरविंद आणि दिव्यशक्ती यांनी आपल्या दिशेने येण्याला उद्देशून ‘डिसेंट’ (मर्यादशील) हा शब्द वापरला आहे. परमेश्वर हाही शेवटी खाली उतरत असतो आणि माणूस हा त्याच्या दिशेने चढत असतो. कुठेतरी दोघांची गाठभेट होत असते; परंतु या सर्व वर्तनाला प्रारंभ होण्यापूर्वी माणसाने आत्मनिरीक्षण करत आत्मसंशोधन केले पाहिजे. तसेच त्याच्यासाठी थोडे ‘एकाग्र’ व्हायला शिकले पाहिजे आणि त्यातून ‘मी कोण ? मी जिवंत आहे, म्हणजे तरी काय ?’, हे स्वतःचे स्वतःला कळले पाहिजे.

श्री. कोंडिबा जाधव

२. परमेश्वरप्राप्तीसाठी त्याच्या आड येणार्‍या गोष्टींचा त्याग केला, तरच ध्येयापर्यंत पोचू शकणे

योगी अरविंद यांनी पुढे जाऊन साधनेमध्ये सुचवले की, ‘एस्पिरेशन’(आकांक्षा) हा निधीध्यास असला पाहिजे. ‘रिजेक्शन’ म्हणजे या साधनेविरुद्ध जे जे काही असेल (साधनामार्गामध्ये अडथळा आणणार असेल), त्याचा परित्याग करणे. तुम्हाला परमेश्वर हवा ना ? त्याचा निधीध्यास घ्या ! तुम्हाला उच्च स्थिती हवी आहे ना ? आदर्श अवस्था हवी ना ? तिचा ध्यास घ्या. त्यानंतर मग मार्गामध्ये जे जे काही येईल, ते बाजूला करा. त्याला ‘रिजेक्शन’ म्हणतात. हे करूनही पूर्ण अवस्थेला पोचाल, याची खात्री नाही; कारण तुम्ही तशी दुबळी सामान्य माणसे आहात. मग त्याला काय हवे ? परमेश्वराची कृपा ! भगवंताची कृपा म्हणजेच ‘तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे’, असे समर्थ रामदासस्वामी यांनी म्हटले असून ते लाभले पाहिजे. ते केव्हा लाभेल ? तेथे ते (योगी अरविंद) ‘सरेंडर’ (शरणागती) हा शब्द वापरतात. आता या सगळ्या अवस्था अनुभवत असतांना खरोखर माणसाच्या जीवनामध्ये काही परिवर्तन घडतात.

३. मनुष्याची दु:खमय जीवनापासून सुटका करण्यासाठी योगी अरविंद यांनी उपासनेचा मार्ग दाखवणे

योगी अरविंद यांना असे म्हणायचे होते की, मला आता एक माणूस पालटायचा नाही, तर अखिल मानवजातच पालटायची आहे. ती परमेश्वराच्या जवळ न्यायची आहे आणि परमेश्वर त्यांच्या जवळ आणायचा आहे. हे संपूर्ण जीवन संघर्षाने व्यापलेले, दुःखाने ग्रासलेले आणि दुरितांनी खरोखर शेवटी असह्य करून ठेवलेले असून ते आम्हाला नकोच आहे. याहून एक आदर्श जीवनाची रचना करायची आहे आणि ही रचना करत असतांना केवळ आंतरराष्ट्रीय परिषदा अन् आम्ही करतो ते राजकारण पुरेसे ठरणार नाही. त्याला योग साधनेची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांनी उपासना, योगसाधना, पूर्ण योग वगैरे काही मार्ग सांगितले. ‘त्या मार्गाने जो कुणी जाईल, त्याला थोडाफार अनुभव येतो’, असे म्हणतात.

४. सदेह अमरत्व प्राप्त करण्यासाठी योगी अरविंद यांनी त्यांच्या देहावर विविध प्रयोग करणे

अरविंद यांची एक प्रतिज्ञा होती. ती मात्र यशस्वी होऊ शकली नाही. त्यांना असे वाटत होते की, अगदी ‘याची देही याची डोळा’ आपण अमरत्वाची प्राप्ती करून घेऊ आणि आपणाला एक प्रकारची सर्वज्ञता लाभेल. योगी अरविंद यांना एका आंतरिक पातळीवर ही सर्वज्ञता लाभलीही होती; परंतु या पार्थिव शरिरामध्ये त्या सर्वज्ञतेचे अणूरेणू मात्र प्रवेश करू शकत नव्हते. आपण हा जड देह कितीही घडवण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला मर्यादा पडतात, हे त्यांना जाणवत होते; म्हणून त्यांनी त्यांच्या शरिरावरही प्रयोग केले. काही काळ केवळ उपवास, तर काही केवळ प्राणायाम करून पाहिला. पुढे त्यांना असे वाटू लागले की, आता दिव्यत्वाच्या स्पर्शाने हे सारे घडणार आहे. ‘खरोखरच चराचरावर ज्याची सत्ता आहे, तो परमेश्वर हा नित्याने आता मला भेटतोच आहे आणि हे मी जाणू शकतो’, असे अरविंद यांनी सांगितले. ‘हे जग सोडून जायचे नाही, दूर कुठे जायचे नाही, आहे या कुडीमध्ये हा जीव असाच धारण करून केवळ फुलत रहायचे, केवळ मोहरत रहायचे आणि देवाला साद घालायची. प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा बाळगायची. आनंदाने जगायचे, दूर कुठेही जायचे नाही’, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे संन्यास ही कल्पना योगी अरविंद यांच्या योगात कुठेही नाही.

५. योगी अरविंद समाधीस्थ झाल्यावरही त्यांच्या चेहर्‍याभोवती ४ दिवस प्रभावळ दिसत असल्याने त्यांची अंतक्रिया (अंत्यविधी) थांबवण्यात येणे

योगी अरविंद जेव्हा समाधीस्थ झाले, तेव्हा वर्तमानपत्रात बातमी येत असे, ‘अरविंद जाऊन काही घंटे होऊन गेले आहेत; पण अजूनही त्यांचे शरीर तसे कोमेजून गेलेले नाही. त्यामुळे आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) ‘नेमके काय झाले आहे ?’, याचे कोडे पडले आहे.’ डॉ. संन्याल या नावाचे कोलकात्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातील एक प्राध्यापक मुद्दाम पाँडेचरीला गेले आणि त्यांनी मृतदेहाची तपासणी केली. शेजारी माताजी शिष्या उभ्या होत्या. ते माताजींना म्हणाले, ‘‘आता अंतक्रिया उरकायला हरकत नाही.’’ माताजी म्हणाल्या, ‘‘नाही, अजून ते वलय स्वच्छ दिसते. तो ‘सुप्रामेंटल लाईट’ (अतीमानस प्रकाशमय मन) त्यांच्या भोवती आहे. अजूनही या शरिराच्या बाहेर ते पडले नाहीत. अंतक्रिया करणार कशी ?’’ त्यावर आधुनिक वैद्य संन्याल म्हणाले, ‘‘माताजी, मला काहीही दिसत नाही.’’ माताजींनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना ते प्रकाशदर्शन घडवले. डॉ. संन्याल यांनी ‘कॉल टू पाँडेचरी’ या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये हे संपूर्ण वर्णन आपल्याला वाचायला मिळेल. ४ दिवसांनी त्यांची अंतक्रिया करण्यात आली. ४ दिवस साधनेची प्रभावळ त्यांच्या भोवती होती.

(साभार : प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या व्याख्यानावरून)

संग्राहक : श्री. कोंडिबा जाधव (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.८.२०२२)