मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांना मानाचे स्थान ! – न्यायमूर्ती प्रतिभा सिंह

मुंबई – भारतीय स्त्रिया भाग्यवान आहेत; कारण मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांनी स्त्रियांना मानाचे स्थान दिले आहे. मनुस्मृतीत म्हटले आहे की, जर कुणी महिलांचा आदर आणि सन्मान करत नसेल, तर संबंधित व्यक्ती करत असलेल्या पूजा-पाठ आणि प्रार्थना यांना काहीच अर्थ रहात नाही, असे प्रतिपादन न्यायमूर्ती प्रतिभा एम्. सिंह यांनी येथे केले. ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ने (एफ्.आय.सी.सी.आय.ने) ‘विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि गणित या क्षेत्रांतील महिलांसमोरील आव्हाने’ या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेच्या उद्घाटन सत्रात न्यायमूर्ती प्रतिभा सिंह बोलत होत्या.

न्यायमूर्ती प्रतिभा सिंह

त्या पुढे म्हणाल्या की,

१. स्त्रियांचा आदर राखण्याच्या संदर्भात विचार केल्यास आशिया खंडातील महिलांना घरात, समाजात किंवा कामाकाजाच्या ठिकाणी वावरतांना आदराची वागणूक दिली जाते. भारताला लाभलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्‍वभूमीमुळे, तसेच धर्मग्रंथांमध्येही तसे सांगितल्यामुळे असे घडते.

२. महिलांनी नेतृत्व करण्याच्या संदर्भात भारत अधिक पुढारलेला आहे. खालच्या वर्गातील महिलांवर होणार्‍या अत्याचारांकडे दुर्लक्षून चालणार नाही; मात्र मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वर्गातील महिलांची प्रगती होत आहे.

३. नोकरी करणार्‍या महिलांनी भारतीय कुटुंबव्यवस्थेतील मूल्ये जपणे आवश्यक आहेत, तसेच स्वतःच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्रित कुटुंबात रहाणे आवश्यक आहे. एकत्रित कुटुंबात राहिल्यास महिलांना उज्ज्वल भवितव्यासाठी घरातून सहकार्य आणि पाठिंबा मिळतो.

संपादकीय भूमिका

एका न्यायमूर्तीपदावरील महिलेने ‘मनुस्मृतीमध्ये महिलेला आदराचे स्थान दिले आहे’, असे सांगितल्यामुळे त्यावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या स्त्रमुक्तीवाल्यांना मिर्च्या झोंबणे साहजिक आहे !