नूपुर शर्मा यांच्या विरोधातील सर्व खटले देहलीत वर्ग ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा

नवी देहली – भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात देशात विविध ठिकाणी ९ गुन्हे नोंद आहेत. त्यांच्याशी संबंधित सर्व खटले देहलीत वर्ग करण्यात यावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. यासमवेतच प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण होईपर्यंत शर्मा यांना अटकेपासून संरक्षणही देण्यात आले आहे. शर्मा यांच्या जिवाला धोका असल्याने हा आदेश देण्यात आला.

यापुढेही नूपुर शर्मा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला, तरी तो देहलीतच वर्ग केला जाईल, असा आदेशही न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने दिला. या प्रकरणावर गेल्या मासात सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने १० ऑगस्टपर्यंत शर्मा यांच्या अटकेवर स्थगिती आणली होती. आता ११ ऑगस्टला वरील आदेश देण्यात आला आहे. मे मासात नूपुर शर्मा यांनी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात देशात, तसेच इस्लामी राष्ट्रांत विरोध झाला होता. त्यानंतर शर्मा यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेऊन क्षमाही मागितली होती. त्या वेळी त्या म्हणाल्या होत्या की, मी माझे आराध्य महादेव यांचा वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांतून सातत्याने होणारा अपमान सहन करू शकले नव्हते.