आसाम पोलिसांनी आतंकवादी आक्रमणाचा कट उधळला : मदरसा चालकाला अटक

चौकशीसाठी मदरशातील ८ मौलवी कह्यात !

मदरसा चालविणारा मुफ्ती मुस्तफा

गौहत्ती (आसाम) – राज्यात मोठे आतंकवादी आक्रमण करण्याचा येथील एका मदरशात रचण्यात आलेला कट आसाम पोलिसांनी उधळून लावला. मोरीगाव येथील  मोईराबारी येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी २७ जुलैच्या रात्री मदरसा चालवणार्‍या मुफ्ती मुस्तफा नावाच्या एका जिहाद्याला अटक केली. या वेळी मदरसा आणि काही निवासस्थाने यांची झडती घेऊन सदर मदरशाला टाळे ठोकण्यात आले.

मुफ्ती मुस्तफा हा या आतंकवादी टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. तो मोइराबारी येथे वर्ष २०१८ पासून ‘जामी-उल्-हुदा’ हा मदरसा चालवत आहे. पोलिसांनी मुस्तफाकडून भ्रमणभाष संच, बँकेचे पासबूक आणि अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत, तसेच चौकशीसाठी मदरशातील ८ मौलवींनाही कह्यात घेतले आहे. शेजारील बांगलादेश, तसेच अन्य अनेक देशांमधून या मदरशाला पैसे पुरवले जात होते, असे म्हटले जात आहे.


आतंकवाद्यांची बांगलादेशमार्गे घुसखोरी ! – पोलीस अधीक्षक

या कारवाईविषयी आसामचे पोलीस अधीक्षक भास्कर ज्योती महंत म्हणाले की, आतंकवादी संघटना आसामला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते बांगलादेशमार्गे राज्यात घुसखोरी करत असून मुसलमान युवकांना ‘हदीस’ची शिकवण देऊन त्यांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत.

संपादकीय भूमिका

देशविघातक कारवाया करण्यासाठी आतापर्यंत अनेक मदरशांचा वापर केला गेल्याचे समोर आले असतांनाही सरकार अशा मदरशांवर बंदी का घालत नाही ?