६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे) यांनी प.पू. दास महाराज यांची अनुभवलेली कृपा !

प.पू. दास महाराज

१. प.पू. दास महाराज यांना त्रासांविषयी सांगताच त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला प्रार्थना करण्यास सांगणे आणि त्यामुळे त्रास उणावणे

‘१५.७.२०२२ या दिवशी सायंकाळी ७ वाजता मला पुष्कळ त्रास होत होता, तसेच माझ्या जिवाची तगमग होत होती. मी प.पू. दास महाराज यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी कपाटातून परम पूज्यांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) मोठे छायाचित्र काढून मला दिले आणि त्यांना मनोमन प्रार्थना करायला सांगितली. त्याप्रमाणे मी त्यांना आर्ततेने प्रार्थना केली, ‘मला यातून सोडवा.’ प्रार्थना केल्यावर साधारण चार ते पाच मिनिटांत माझा त्रास उणावला. ही प.पू. दास महाराज यांनी माझ्यावर केलेली कृपाच होती.

२. प.पू. दास महाराजांनी ‘सौ. शालिनीच्या लिंगदेहाचे रक्षण व्हावे’, यासाठी मारुतिरायाला प्रार्थना करून विभूती फुंकरणे

१६.७.२०२२ या दिवशी प.पू. दास महाराज (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांच्या पार्थिवाचे दर्शन घ्यायला आले होते. तेव्हा त्यांनी प्रार्थना करून विभूती फुंकरली, तसेच पार्थिवाला एक फूल वाहून प्रदक्षिणा घातली. त्याबद्दल एका साधकाने त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘आश्रमात शालिनीचा स्थूलदेह आणि लिंगदेह यांचे रक्षण होत आहे; पण त्यांचे पार्थिव रामनाथीहून फोंड्याला स्मशानात नेतांना इतर पितर भेटायला आले, तर त्यांच्या मार्गात अडथळा येईल; म्हणून मी मारुतिरायाला प्रार्थना करून विभूती फुंकरली.’’ त्यामुळे अंत्यविधीला जातांना कसलाही अडथळा न येता मारुतिरायांनी तिचे रक्षण केले.’

– श्री. प्रकाश मराठे (सौ. शालिनी मराठे यांचे पती) (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.७.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक