हिंदूंच्या हितासाठी संघटित होण्याचा सातारा येथील हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

महाआरतीसाठी उपस्थित हिंदूंना संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे

सातारा, २५ जुलै (वार्ता.) – सकल हिंदु संघटनांच्या वतीने हिंदु जनजागृतीसाठी २४ जुलै या दिवशी सायंकाळी मिरवणूक आणि महाआरती यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु धर्मावर होणारे दैनंदिन आघात रोखण्यासाठी, तसेच हिंदूंच्या हितासाठी संघटित होण्याचा निर्धार उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी केला.

सायंकाळी ५ वाजता राजवाडा बसस्थानक येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. गोलबागमार्गे, मोती चौक, ५०१ पाटी, देवी चौक, राजपथमार्गे पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर येथे मिरवणूक काढण्यात आली. मंदिरात मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी हिंदू आणि हिंदु धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी मनोगत व्यक्त केले. यानंतर महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यामध्ये विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवराज्याभिषेक उत्सव समिती, हिंदु जनजागृती समिती, योग वेदांत सेवा समिती, स्वातंत्र्यवीर सावरकर विचार संस्था आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेवर नवे आक्रमण ! – हेमंत सोनवणे, हिंदु जनजागृती समिती

या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे म्हणाले की, भारतामध्ये शरियत आधारित अर्थव्यवस्था वाढत आहे. मुसलमानांकडून प्रत्येक वस्तू ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ अत्यावश्यक झाले आहे. देशात केवळ १५ टक्के असणार्‍या अल्पसंख्य मुसलमान समाजाला इस्लामनुसार संमत हलाल मांस खायचे आहे; परंतु त्यासाठी ८५ टक्के जनतेवरही हलाल मांस खाण्याची वेळ आली आहे. आतातर ‘हलाल प्रमाणपत्र’ केवळ मांसापुरते मर्यादित न रहाता खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहनिर्माण संस्था, मॉल यांसाठी चालू झाले आहे. याविषयी महत्त्वाची माहिती देणारा ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे. तरी येथे जमलेल्या हिंदु बांधवांना मी आवाहन करतो की, हा ग्रंथ समाजातील सर्व हिंदूंपर्यंत पोचवण्यासाठी आपण संघटितपणे प्रयत्न करूया.