भारताने ३ सहस्र वर्षांपूर्वी शस्त्रकर्म आरंभले !

‘अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान केंद्र’ करू इच्छिते संशोधन !

नवी देहली – चेहरा सुशोभित करण्यासाठी कॉस्मेटिक शस्त्रकर्म असो, सिझेरियन शस्त्रकर्माने मुलाचा जन्म असो किंवा अत्यंत कठीण परिस्थितीत एखाद्याचे कापलेले अवयव पुनर्संचयित (जोडण्याची) करणे असो, हे सर्व वैद्यकीय विज्ञान जसजसे प्रगत होत गेले, तसतसे ते शिकले आहे; परंतु भारतात ‘सुश्रुत संहिता’ हा एक ग्रंथ आहे, ज्यामध्ये एका महर्षींनी सर्वांत कठीण शस्त्रकर्म करण्याचे सर्व मार्ग सांगितले आहेत आणि त्याच्या आधारे संपूर्ण जग शस्त्रकर्म शिकले. भारताने ३ सहस्र वर्षांपूर्वी शस्त्रकर्म चालू केले असून त्यावर ‘अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान केंद्र’ (एम्स) संशोधन करू इच्छिते. हे संशोधन करण्यामागचा मुख्य उद्देश आहे इतिहास दुरुस्त करणे ! ग्रीस आणि अमेरिका यांसारखे देश प्लास्टिक सर्जरीपासून जवळजवळ प्रत्येक नवीन तंत्रज्ञान स्वत:चे म्हणून इतरांना शिकवत आहेत; पण भारताने आता संपूर्ण जगाला इसवी सन पूर्व ६०० वर्षांच्या विश्वकोष आणि वैद्यकीय शास्त्रातील सर्वांत कठीण तंत्राचे जनक यांची ओळख करून द्यायची आहे.

हे होते जगातील पहिले शस्त्रकर्म !

जगातील पहिली प्लास्टिक सर्जरी ३ सहस्र वर्षांपूर्वी काशीमध्ये झाली होती. तशी इतिहासात नोंद आहे. जेव्हा एक व्यक्ती नाक कापलेल्या स्थितीत महर्षि सुश्रुत यांच्याकडे आली, तेव्हा प्रथम त्यांनी तिला मादक पदार्थ प्यायला लावले, जेणेकरून तिला वेदना होऊ नयेत. कपाळावरून कातडीचा काही भाग घेतला. पानाद्वारे नाकाचा आकार समजून घेतला आणि टाके घालून नाक जोडले.

शस्त्रकर्मासाठी १२५ प्रकारच्या उपकरणांचा वापर

‘सुश्रुत संहिते’त अशी नोंद आहे की, महर्षि सुश्रुत यांनी वेगवेगळ्या १२५ शस्त्रकर्म उपकरणांचा वापर केला. चाकू, सुया, चिमटे अशी वेगवेगळी उपकरणे ते उकळून वापरत असत. सुश्रुत संहितेत १८४ अध्याय असून त्यामध्ये १ सहस्र १२० रोगांचे वर्णन केले आहे, तसेच ७०० औषधी वनस्पतींचा उल्लेख केलेला आहे. १२ प्रकारचे फ्रॅक्चर (अस्थीभंग) आणि ७ डिस्लोकेशन (निसटणे) स्पष्ट केले आहेत.

शस्त्रकर्माचे जनक महर्षि सुश्रुत

महर्षि सुश्रुत यांना ३०० वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रकर्म येत होती. ज्यामध्ये कान आणि नाक यांची शस्त्रकर्म मुख्य होते. डोळ्यांच्या शस्त्रकर्मात त्यांचे प्राविण्य होते. शस्त्रकर्माद्वारे मूल जन्माला येणे, भूल देण्याचे योग्य प्रमाण म्हणजेच उपशामक औषध यांविषयी त्यांना पुष्कळ ज्ञान होते. महर्षि सुश्रुत यांनी आपल्या शिष्यांना शिकवण्यासाठी  फळे, भाज्या आणि मेणाचे पुतळे यांचा वापर केला. नंतर त्यांनी स्वत: मृतदेहांवर शस्त्रकर्म शिकून घेतले आणि नंतर शिष्यांनाही शिकवले.

संशोधनाची आवश्यकता का जाणवली ?

केरळ राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता ९वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात ‘फादर ऑफ सर्जरी’ (शस्त्रकर्माचे जनक) म्हणून अरब मुसलमान अबू अल्-कासिम अल्-जवाहरीविषयी शिकवले जात आहे. महर्षि सुश्रुत यांचा जन्म इसवी सन पूर्व ८०० मध्ये झाला होता, तर अल जवाहरीचा जन्म मदिना येथे सन ८३६ मध्ये झाला होता. आधुनिक वैद्यकीय विज्ञानामधील तज्ञांचा असा दावा आहे की, अनुमाने ४०० वर्षांपूर्वी जगाला शस्त्रकर्माची माहिती मिळाली होती; पण महर्षि सुश्रुत यांनी हे काम काही सहस्र वर्षांपूर्वी दाखवून दिले होते. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन’मध्ये महर्षि सुश्रुत यांची मूर्ती आहे. एम्स्च्या नुकत्याच बांधण्यात आलेल्या प्लास्टिक सर्जरी विभागात महर्षि सुश्रुत यांचे पेटिंग लावण्यात आले आहे.