नोंद
नुकतेच अभिनेते रणवीर सिंह यांनी एका मासिकासाठी अंगावर एकही वस्त्र न घालता केलेले ‘फोटोशूट’ (छायाचित्रण) चर्चेत आहे. रणवीर सिंह यांनी केवळ याचे समर्थन केले नसून ‘मी १ सहस्र लोकांसमोर एकही वस्त्र न घालता उभा राहू शकतो. यामुळे मला काहीच फरक पडत नाही; मात्र पहाणारे लोक अस्वस्थ होतील’, असे निर्लज्जपणे म्हटले आहे. अभिनेते रणवीर सिंह यांनी यापूर्वी ‘रामलीला’ या हिंदी चित्रपटात दीपिका पदुकोण या अभिनेत्रीसमवेत अनेक अश्लील दृश्ये चित्रीत केली आहेत. यातून ‘रणवीरसारख्या अभिनेत्यांकडून भारतीय संस्कृती पायदळी तुडवण्याचे प्रकार जाणीवपूर्वक आणि वारंवार केले जात आहेत. यापूर्वीही चित्रपट अभिनेते आमीर खान यांनी ‘पीके’ या हिंदी चित्रपटाच्या विज्ञापनात अंगावरील सगळे कपडे काढून केवळ ‘रेडिओ’ स्वत:समोर धरला होता. प्रसिद्धीसाठी हपापलेले अभिनेते कोणत्या थराला जातात, हे यातून लक्षात येते.
गेल्या काही वर्षांपासून पाश्चात्त्यांचा अनुनय करणारे काही ‘उन्मत्त’ निर्माण होत असून अशांना भारतीय संस्कृती वारंवार पायदळी तुडवण्यात नेहमीच धन्यता वाटते. शालीनता हा एक भारतीय संस्कृतीतील मुख्य घटक आहे. संस्कृती या घटकामुळेच भारतीय हे पाश्चात्त्यांपासून वेगळे आहेत. जेव्हा आपण समाजव्यवस्थेत रहातो, तेव्हा ‘मी कसाही राहीन, कसाही वागेन, कपडे घालीन अन्यथा नाही’, असा विचार करणे अयोग्य आहे. ‘माझ्या वागण्याने समाजावर काय परिणाम होईल’, याचाही विचार करणे आवश्यक आहे. समाजातील काही घटक अनुनयप्रेमी असतात, विशेष करून युवा पिढी ही तात्काळ अभिनेत्यांची कृत्ये कृतीत आणतात. त्यामुळे ‘अयोग्य कृत्ये ही योग्यच आहेत’, असेच विचार आज समाजात वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात सामाजिक असंतुलन होत आहे. यातून स्वैराचारी पिढी निर्माण होत आहे.
एकूण अपकृत्ये पहाता आता समाजाचेच दायित्व वाढले असून चंगळवाद-स्वैराचार यांचे समर्थन करणारे, समाजाला आदर्शवादापासून दूर नेणारे, अश्लीलतेला प्रोत्साहन देणारे असे अभिनेते आणि अभिनेत्री यांची विज्ञापने अन् चित्रपट यांवर वैध मार्गाने बहिष्कार टाकायला हवा. याद्वारे त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्यास अशा अपप्रकारांना काही प्रमाणात आळा बसेल, हे नक्की !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर