वाळू माफियांवरील कारवाईत कुचराई केल्याच्या प्रकरणी वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथील ३ पोलिसांचे स्थानांतर !

प्रातिनिधिक छायाचित्र

संभाजीनगर – गोदावरी नदीच्या पात्रातील वाळू उपसणार्‍या वाळू माफियांवर कारवाई न केल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस ठाण्यातील ३ पोलीस कर्मचार्‍यांचे ग्रामीण पोलीस मुख्यालयात स्थानांतर करण्यात आले. पोलीस हवालदार राहुल थोरात, पोलीस नाईक किशोर थोरात आणि परमेश्‍वर चंदेल, अशी त्यांची नावे आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी ही कारवाई केली.

शासकीय गौण खनिजाचा अवैध व्यापार करणार्‍या वाळू माफियांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना नियमबाह्यपणे साहाय्य केल्याची कृती करतांना आतापर्यंत आढळून आलेले वीरगाव पोलीस ठाण्यातील ४ पोलीस अधिकारी आणि १२ पोलीस कर्मचारी यांच्यावर तत्कालीन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला होता. (या खनिज क्षेत्रातील पोलीस ठाण्याचा इतिहासच असा असेल, तर येथे अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी नेमणे आवश्यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘गुन्हेगारांवर कारवाई न करणार्‍या कर्तव्यचुकार पोलिसांचे केवळ स्थानांतर करून उपयोग नाही’, हे अधिकार्‍यांच्या लक्षात कसे येत नाही ?
  • स्थानांतराने पोलिसांच्या वृत्तीत काहीच फरक पडणार नसल्याने तिथे जाऊनही अशाच प्रकारचे गुन्हे पोलीस करणार नाहीत कशावरून ?
  • अशा कामचुकार पोलीस कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कठोर कारवाईच हवी !