११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम
नवी मुंबई, २२ जुलै (वार्ता.) – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त राबवण्यात येणार्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमामध्ये महिला बचत गटांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी केले आहे. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या यशस्वी कार्यवाहीसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने वाशी येथे महिला बचत गट आणि संस्था यांची कार्यशाळा आयोजित केली होती. या प्रसंगी सुजाता ढोले बोलत होत्या. या वेळी महिला बचत गटातील पुष्कळ महिला उपस्थित होत्या.
सुजाता ढोले पुढे म्हणाल्या की,…
१. सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
२. यासाठी मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वजांची आवश्यकता लागणार आहे. या कामी महिला संस्था आणि महिला बचत गट यांनी प्रत्यक्ष सहयोग देणे आवश्यक आहे. यातून त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि राष्ट्रीय कार्यात त्यांचे सक्रीय योगदानही राहील. या संधीचा महिलांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा.
राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडणार असल्याने नागरिकाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात उत्साहाने सहभाग घ्यावा ! – अभिजित बांगर, महापालिका आयुक्त
‘केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या (अमृतमहोत्सवी) वर्धापनदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली जात आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या घरावर, तसेच इमारत, कार्यालय आणि संस्था येथे ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वयंस्फूर्तीने तिरंगा फडकवायचा आहे. आपले राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याची ही एक संधी असून या निमित्ताने संपूर्ण देशभरात एकाच वेळी तिरंगा झेंडा फडकवला जाऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात उत्साहाने सहभाग घ्यावा’, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.