|
भरतपूर (राजस्थान) – येथील आदिबद्री आणि कनकांचल क्षेत्रांमध्ये अवैधरित्या होणार्या उत्खननाच्या विरोधात गेल्या ५५० दिवसांपासून साधू, संत आणि गावकरी आंदोलन करत आहेत. संत बाबा विजयदास यांनी १९ जुलै या दिवशी आंदोलनाच्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यात ते होरपळल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्याचे मंत्री विश्वेंद्र नाथ सिंह यांनी संतांची भेट घेतली. त्यांनी येत्या १५ दिवसांत संतांच्या मागण्या मान्य करण्याचे आणि या भागाला ‘वनक्षेत्र’ घोषित करण्याची अधिसूचना काढण्याचे आश्वासन संतांना दिले. त्यांनी संतांना आंदोलन समाप्त करण्याची विनंती केल्यावर संतांनी हे आंदोलन समाप्त केले आहे.
सरकारने दिलेल्या आश्वासनामध्ये येथे असलेल्या जुन्या खाणींना अन्यत्र अनुमती दिली जाणार आहे. यामुळे येथील २ सहस्र ५०० लोक बेरोजगार होणार आहेत. त्यांना अन्यत्र रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य सरकार या ठिकाणाला धार्मिक पर्यटन स्थळ बनवू इच्छित आहे. (‘धार्मिक स्थळ’ हे कधी ‘पर्यटन स्थळ’ होऊ शकत नाही, तर ते साधनेचे ठिकाण असते. हिंदूंना आणि त्यांच्या शासनकर्त्यांना धर्मशिक्षण नसल्याने ते त्याकडे पर्यटन स्थळ म्हणून पहातात, हे त्यांना लज्जास्पद ! – संपादक)
संपादकीय भूमिकावैध मार्गाने आंदोलन करूनही सरकारला जाग येत नव्हती. अंततः संतांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यावर जाग आली, हे काँग्रेस सरकारला लज्जास्पद ! अशा काँग्रेसला धर्माभिमानी जनतेने निवडणुकीत धडा शिकवल्यास आश्चर्य वाटू नये ! |