नाशिक येथील वर्ष २०२७ मध्ये होणार्‍या सिंहस्थ पर्वाच्य पार्श्‍वभूमीवर साधूग्रामसाठी भूमीचे नियोजन !

साधूग्राममध्ये भूमी अधिग्रहणासाठी हालचाली चालू !

नाशिक – वर्ष २०२७ मधील सिंहस्थ पर्वाचा संभाव्य दिनांक घोषित झाल्यानंतर आता प्रशासकीय पातळीवर ‘नाशिकमधील तपोवन येथे साधूग्रामसाठी भूमी कशा पद्धतीने अधिग्रहित करता येतील ?’, या दृष्टीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महानगरपालिकेकडे पत्र पाठवून विविध प्रकारची माहिती मागवली आहे.

१. साधूग्रामसाठी जवळपास २८६ एकर भूमीची आवश्यकता असून सद्यःस्थितीत महानगरपालिकेकडे केवळ ७० एकर भूमी उपलब्ध आहे. उर्वरित भूमी अधिग्रहित करण्यासाठी रोखीने भूसंपादन केल्यास १ सहस्र ५०० कोटी रुपयांहून अधिक व्यय येईल.

२. या पार्श्‍वभूमीवर ‘टी.डी.आर्.’द्वारे भूमी संपादित करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. महानगरपालिकेने सिंहस्थ पर्वासाठी तपोवन येथे ७० एकर भूमी संपादित केली आहे; मात्र जवळपास २१६ एकर भूमी (क्षेत्र) अद्यापही संपादित झाले नसून संपादनाचा व्यय अवास्तव आहे. त्यामुळे भाडेतत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भूमी अधिग्रहित केल्या जात आहेत.

३. ‘महानगरपालिकेकडील भूमीपैकी किती भूमी साधूग्रामसाठी आरक्षित आहे ? त्यातील सद्यःस्थितीत संपादित भूमी किती आहे ?, संपादन करावयाची शेष भूमी किती आहे ?  भविष्यात आरक्षित भूमी कह्यात घेण्यासाठी काय नियोजन केले आहे ?, भाडेतत्वावर भूमी घेण्यात आली आहे का ? आणि वर्ष २०२७ मध्ये होणार्‍या सिंहस्थ पर्वासाठी कायमस्वरूपी आरक्षित जागा किती लागणार आहे ?’, यांविषयीची माहिती मागितली आहे.

४. ‘सिंहस्थ पर्वासाठी भूमीची आवश्यकता आणि आराखडा सिद्ध करण्यासाठी महानगरपालिकेने साधू-महंत आणि पुरोहित संघाशी विचारविनिमय करावा’, अशी सूचना केली आहे.

५. प्रतिवर्षी सिंहस्थ पर्वामध्ये तपोवन परिसरामधील हिरवीगार भूमी अधिग्रहित होत असल्यामुळे येथील बर्‍याच शेतकर्‍यांची भूमी शहरातील काही ‘टी.डी.आर्. लॉबी’शी संबंधित व्यक्तींनी खरेदी केली आहे. त्यांत बरेच राजकीय पुढारी आणि महत्त्वाचे अधिकारी भागीदार असल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आडून मोठ्या विकासकांचा ‘रेडीरेकनर’ दराच्या दुपटीने मिळणारा भूसंपादन मोबदला मिळवण्यासाठी आटापिटा चालू आहे.

६. यापूर्वी प्रोत्साहनपर म्हणून अडीचपट ‘टी.डी.आर्.’ देण्याचा प्रस्ताव चर्चेत आला होता; मात्र शेतकर्‍यांनी संबंधित भूमीचे ‘रेडीरेकनर’ मूल्यांकन अल्प असल्यामुळे त्याकडे पाठ फिरवली.

‘टी.डी.आर्.’ म्हणजे काय ?

‘टी.डी.आर्.’ला अर्थात् ‘ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राइट्स’ला मराठीत ‘हस्तांतरण विकास अधिकार’ म्हणतात. हे ‘टी.डी.आर्.’ कुठून येतात ? काही वेळेस शासन रस्ता रुंदीकरण, बगीचे, पटांगणे इत्यादी सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी भूमी संपादित करते किंवा आरक्षण घोषित करते. अशी भूमी शासनाला दिल्यावर किंवा इतर कारणासाठी भूमी संपादित झाल्यावर त्याचा मोबदला रोख किंवा ‘टी.डी.आर्.’च्या स्वरूपात देण्यात येतो. टी.डी.आर्. हे ‘डी.सी.आर्.’ (डेव्हलपमेंट राइट सर्टिफिकेट) स्वरूपात देण्याची पद्धत आहे. ज्या व्यक्तीस हे ‘टी.डी.आर्.’ मिळतात, ती व्यक्ती स्वत: त्याचा उपयोग करू शकते किंवा खुल्या बाजारात ते विकूही शकते.