वास्को, २० जुलै (वार्ता.) – सडा, वास्को येथे रहाणार्या सुमित्रा मेल्पापूर या एका १४ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ‘मुरगाव पोर्ट ॲथॉरिटी’च्या मुख्य कार्यालयामागील रस्त्याने जातांना नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आली. नागरिकांनी तातडीने याविषयी मुरगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी घरात झालेल्या किरकोळ वादातून तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.
शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक !
‘सध्या होणार्या आत्महत्या हे जीवनातील नैराश्य, संकट, कसोटीचे क्षण, तणावाचे प्रसंग यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक आत्मबळ देण्यास सध्याची शिक्षणप्रणाली, समाजरचना आणि संस्कार अपयशी ठरल्याचेच द्योतक आहे. साधनेमुळे प्राप्त होणार्या आत्मबलाने मन कणखर, तसेच समाधानी आणि आनंदी बनते. साधनेमुळे प्रत्येक गोष्ट प्रारब्धानुसार घडणार आहे, या शाश्वत सत्याची जाणीव रहाते. एवढेच नव्हे तर जिद्द, चिकाटी यांसारखे गुण निर्माण होऊन ध्येयपूर्तीसाठी ईश्वरी अधिष्ठान लाभून यशप्राप्तीही होते. त्यामुळे शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण, साधना इत्यादी गोष्टींचा समावेश असणे अत्यावश्यक ठरते !