कोल्हापूर, २० जुलै (वार्ता.) – महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणार्या शिवछत्रपती महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरवस्थेत आहेत. दिवसेंदिवस त्यांची अधिकच दुरवस्था होत आहे. २ वर्षांपूर्वी पावसाळ्यात विजयदुर्गची तटबंदी ढासळली होती. पन्हाळगडची तटबंदी अथवा बुरुज ढासळणे, हे तर नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडदुर्गांची दुरवस्था आणि संवर्धन यांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करावे, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी सामाजिक माध्यमांद्वारे राज्यशासनाकडे केली आहे.
या ‘पोस्ट’मध्ये छत्रपती संभाजीराजे म्हणतात, ‘‘केवळ तात्पुरते उपाय करून आणि जुजबी डागडुजी करून गडकोटांचे संवर्धन होणार नाही. हा ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोचवायचा असेल, तर त्याच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन आणि भरीव योजना राबवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय अथवा किमान महामंडळाची निर्मिती करावी. विद्यमान राज्यशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, ही एक दुर्गप्रेमी म्हणून मी मागणी करत आहे.’’