काही दिवसांपूर्वी (१ जुलै २०२२ या दिवशी) भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) ‘घातक’ या लढाऊ जेट विमानाची चाचणी घेतली. येत्या काळात संपूर्ण युद्धनीती पालटवण्याची शक्ती असलेले तंत्रज्ञान भारताने आता आत्मसात् केले आहे. त्यामुळेच भारताने ‘घातक’च्या चाचणीतून काय मिळवले ? या चाचणीचे भविष्यात काय परिणाम होणार ? यातून आपण कोणते तंत्रज्ञान विकसित केलेले आहे ? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीचा हा लेखप्रपंच…
१. गुप्त तंत्रज्ञान वापरून बनवलेले ‘घातक’ लढाऊ विमान
‘घातक’ हे ‘डी.आर्.डी.ओ.’ बनवत असलेले (UCAV – यूकॅव्ह) म्हणजेच स्वयंचलित मानवरहित लढाऊ विमान उड्डाणाचे (‘स्टेल्थी अनमँड कॉम्बॅक्ट एअर व्हेईकल’चे) छोटे स्वरूप आहे. त्याच्या नावात दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ‘स्टेल्थ टेक्नॉलॉजी’ (गुप्त तंत्रज्ञान). हे असे तंत्रज्ञान आहे की, ज्यात अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा संगम आहे. ज्यांचा वापर करून एखादी वस्तू हवेत रडारवरून अदृश्य करता येऊ शकते अथवा ती अदृश्य रहाते. जर आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने हवेत प्रवास करणार्या गोष्टींचा ‘व्हिसिबल स्पेक्ट्रम’ (दृश्य वर्णपट), ‘इन्फ्रारेड रडार सिग्नेचर’, ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’, तसेच ‘इलेक्ट्रॉनिक रेडिएशन’ या सर्व गोष्टी नियंत्रित करू शकलो किंवा त्या बाजूला काढू शकलो, तर अशी वस्तू हवेत प्रवास करत असतांना रडारवरून अदृश्य रहाते. यालाच ‘स्टेल्थ टेक्नॉलॉजी’ (गुप्त तंत्रज्ञान) असे म्हणतात. भारताकडे आजवर असे तंत्रज्ञान नव्हते. जगात केवळ अमेरिका आणि इस्रायल यांच्याकडे असे तंत्रज्ञान असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच भारत हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी गेली काही दशके काम करत आहे.
‘एरोनॉटिकल डेव्हल्पमेंट एस्टॅब्लिशमेंट (एडीई)’, ‘डी.आर्.डी.ओ.’ आणि भारतीय हवाई दल यांनी एकत्रितपणे स्टेल्थ पद्धतीच्या यूकॅव्हच्या निर्मिती साठी काम चालू केले. आधी ‘ऑरा’ नावाने वर्ष २००९ मध्ये या प्रकल्पाला प्रारंभ केला होता; पण वर्ष २०१५ मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकल्पाला प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले आणि याचे नामकरण ‘घातक’ असे करण्यात आले. यानंतर या दोन्ही संस्थांनी हवाई दलासह एकत्रितपणे गेल्या ५ ते ७ वर्षात हे तंत्रज्ञान भारतात विकसित केले.
२. ‘घातक’ लढाऊ विमानाला दिलेले मूतस्वरूप
एखादे ‘स्टेल्थ यूकॅव्ह’ (गुप्त तंत्रज्ञान वापरलेले मानवरहित लढाऊ विमान) बनवत असतांना अनेक प्रकारचे तंत्रज्ञान एकाच वेळी शिकून त्याचे एकत्रीकरण करावे लागते. एखादे विमान बनवतांना की ‘जे स्वतःहून उड्डाण करील, स्वतःहून हवेत मार्ग क्रमण करील, स्वतःहून भूमीवर उतरेल, ज्याची चाके ते स्वतःहून पोटात घेईल, भूमीवर उतरतांना स्वतःहून ती चाके बाहेर काढेल’, अशा अन्य सर्वाचा विचार करावा लागतो. हे सर्व करतांना ते विमान ‘स्वतःजवळचे क्षेपणास्त्र, बाँब, ‘लेझर गायडेड’ क्षेपणास्त्र अशी अत्याधुनिक आयुधे घेऊन शत्रूच्या गोटात प्रवेश करून स्वतःचे लक्ष्य साध्य करील आणि शत्रूच्या रडारवरून अदृश्य राहील’, या सर्वांचे एकत्रीकरण करून त्याला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप देणे, हे तितके कठीण आहे. त्यामुळेच जगातील मोजक्या देशांकडेच असे तंत्रज्ञान आहे.
३. ‘घातक’ – प्रगत युद्धातील एक मैलाचा दगड
डी.आर्.डी.ओ.ने ‘घातक’च्या छोट्या स्वरूपाची यशस्वी चाचणी घेऊन स्वतःच्या पुढच्या प्रवासाचा मार्ग मोकळा केला आहे. ‘घातक’ची ही प्रतिकृती अमेरिकेच्या प्रसिद्ध ‘बी-२ स्टेल्थ बाँबर’ विमानाशी मिळति जुळति आहे. ज्याला ‘फ्लाईंग विंग डिझाईन’ म्हटले जाते. याचे डिझाईन करतांना ‘स्टेल्थ’ हे सगळ्यात अत्युच्च प्राधान्यावर ठेवण्यात आलेले आहे. याच्या इंजिनाची पाती कुठूनही दिसणार नाहीत, अशा प्रकारे याची रचना करण्यात आली आहे. तसेच यात वापरण्यात आलेले ‘मटेिरयल कंपोझिट’ (संमिश्र साहित्य) आणि यावर दिला गेलेला रंगही रडारचे सिग्नल शोषणारा आहे. ज्यामुळे ‘घातक’ हे रडारवर संपूर्णपणे अदृश्य राहील. १ जुलैला केलेली चाचणी प्रामुख्याने ‘घातक’मधील यंत्रणा आपापसांत योग्य ताळमेळ राखून हवाई प्रवास करू शकतात कि नाही ? याची पडताळणी करण्यासाठी होती. ज्यात हे ‘स्विफ्ट मॉडेल’ (वेगवान प्रतिकृती) यशस्वी ठरले आहे. त्याचसमवेत त्याच्या ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानाची ही चाचणी घेतली गेली आहे. ही यशस्वी चाचणी भारताच्या पाचव्या पिढीतील स्वबळावर निर्माण होत असलेल्या ‘ॲडव्हान्स मिडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट (ए.एम्.सी.ए. – प्रगत मध्यम पद्धतीचे लढाऊ विमान)’साठी एक मैलाचा दगड ठरली आहे.
४. ‘घातक’ लढाऊ विमानाची क्षमता आणि भेदकता
या यशस्वी चाचणीनंतर पहिले ‘घातक’ हे लढाऊ जेट विमान वर्ष २०२५ पर्यंत चाचणीसाठी सिद्ध असेल. घातक आपल्यासह २ सहस्र किलो वजनाचे क्षेपणास्त्र, ‘लेझर गायडेड बाँब’, ‘प्रिसिजन गायडेड बाँब’ आणि मिसाईल (बालाकोट नंतरच्या आक्रमणात वापरले गेलेले ‘स्पाईस’ किंवा ‘राफेल’ लढाऊ विमानासह विकत घेतलेले ‘हॅमर’सारखे क्षेपणास्त्र) घेऊन जाऊ शकणार आहे. हवेत तब्बल ३० सहस्र फुटांपर्यंत उंच जाण्याची आणि जवळपास १.२ मॅक (१ सहस्र ५०० किलोमीटर / प्रतिघंटा) वेगाने जाण्याची क्षमता असेल. ‘घातक’ हे सुपरसॉनिक वेगाने (ध्वनीवेगातीत) प्रवास करणारे जगातील पहिले ‘स्टेल्थ यूकॅव्ह’ असेल. ते ३०० किलोमीटरपर्यंत लक्ष्याचा वेध घेऊ शकणार आहे.
याची सगळ्यात मोठी उपयुक्तता म्हणजे स्टेल्थ असल्यामुळे रडार यंत्रेणेने सुरक्षित असलेल्या शत्रूच्या एखाद्या सैन्यतळाची सुरक्षायंत्रणा भेदून किंवा तिला सुगावा लागू न देता क्षेपणास्त्र डागण्यात सक्षम असेल. ज्यात सैन्यतळ संपूर्ण बेचिराख होऊ शकते, तसेच ‘घातक’ हे संपूर्णपणे उपग्रह यंत्रणांशी ही जोडण्यात येईल. ज्यामुळे ज्याच्या मार्गाची सर्व यंत्रणा भूमीवरून नाही, तर भारताच्या अवकाशात असलेल्या उपग्रहांवरून नियंत्रित केली जाऊ शकेल. (अमेरिका अशा पद्धतीने सिद्ध केलेल्या ‘स्टेल्थ यूकॅव्ह’चे नियंत्रण करण्यात सक्षम आहे. भारत स्वबळावर हे तंत्रज्ञान विकसित करत असल्याचे अनेक संरक्षण तज्ञांचे म्हणणे आहे.)
५. भारताची युद्धाच्या पालटणार्या पटावरील एक चाल
‘घातक’ हे नावाप्रमाणेच शत्रूसाठी घातक ठरणारे तंत्रज्ञान आहे. या माध्यमातून भारताने आत्मनिर्भरतेकडे एक उंच उडी घेतली आहे. १ जुलैला झालेली चाचणी नुसती एखाद्या मानवरहित जेट विमानाची चाचणी नव्हती, तर युद्धाच्या पालटणार्या पटावर भारताची एक चाल होती. या चालीने भारत जगाच्या तुलनेत कुठेही मागे नाही आणि स्वबळावर असे कठीण तंत्रज्ञान निर्माण करण्यात सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.
– विनीत वर्तक, अभियंता, मुंबई
(साभार : विनीत वर्तक यांचे ‘ब्लॉगस्पॉट’)