‘सायबर स्टॉकिंग’चे वाढते संकट !

तुम्ही सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या ‘पोस्ट’(लिखाण), करत असलेले ‘चॅटिंग’ (संभाषण) आणि संगणकीय ज्ञानजालावर (इंटरनेटवर) पहात असलेली संकेतस्थळे (साईट्स) यांमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल; पण यातून तुम्हाला ‘ब्लॅकमेल’ (धमकी देऊन पैशांची मागणी करणे) केले जाण्याचीही शक्यता आहे. सामाजिक माध्यमे किंवा संकेतस्थळे यांवर तुमचा पाठलाग करणारेही आहेत. हे घडू नये आणि हा पाठलाग थांबावा, यासाठी काय कराल ?

‘सायबर स्टॉकिंग’ म्हणजे काय ?

‘सायबर स्टॉकिंग’ हा सायबर गुन्हेगारीचाच एक चेहरा आहे. यात एखादी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह दुसरी व्यक्ती अथवा व्यक्तींचा समूह यांचा इंटरनेटच्या माध्यमातून पाठलाग करतो आणि त्याला अनेक प्रकारे हानी पोचवण्याचा अन् त्याचा छळ करण्याचा प्रयत्न करतो.

– अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

१. अनेक जण सामाजिक माध्यमांवर वावरतांना किंवा त्यांचा वापर करतांना विविध चुका करत असणे

 

अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

‘लाईक’ (आवडले), ‘शेअर’ (अन्यांना पाठवा) आणि ‘सबस्क्राईब’ (सदस्य व्हा) च्या काळात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी पालटलेल्या आहेत. दिवसाचा प्रारंभ, तसेच शेवट हा सामाजिक माध्यमांवर फेरफटका मारल्याविना होत नाही. आपण विविध संकेतस्थळांवर ‘पोस्ट’ प्रसारित करत असतो. त्या किती लोकांना आवडल्या आणि त्या किती जणांनी पुढे पाठवल्या, याची अनेकांना उत्सुकता असते. यामुळे आपण कळत नकळत अनेक चुका करत असतो. या चुका कधी कधी आपल्याला अडचणीत आणू शकतात. आपल्या नकळत अनेक जण आपला पाठलाग करत असतात, आपल्याला ‘फॉलो’ (अनुसरण) करत असतात. साधारणत: अनेक जण आपापल्या ‘वॉल’वर (सामाजिक माध्यमाच्या मुख्य पानावर) लोकांनी पहावे; म्हणूनच ‘पोस्ट’ करतात. त्यामुळे सहज कुणीही कुणाच्या ‘वॉल’वर फेरफटका मारून आले आणि त्यातून जर त्यांना त्रास होत नसेल, तर तो गुन्हा होत नाही; परंतु असा फेरफटका मारण्यामागे काही वेगळे उद्दिष्ट असेल, तर तो पाठलाग गुन्हा ठरू शकतो.

२. सामाजिक माध्यमांवर विशिष्ट उद्दिष्ट ठेवून एखाद्या महिलेचा ‘ऑनलाईन’ पाठलाग केला जाणे

प्रातिनिधिक छायाचित्र

वर्ष २०१३ नंतर ‘क्रिमिनल लॉ अमेंडमेंट’, म्हणजेच गुन्हेगारी कायद्यातील सुधारणेनुसार ३५४ (ड) हे कलम ‘स्टॉकिंग’ म्हणजेच पाठलाग, यासाठी अस्तित्वात आले आहे. त्यानुसार एखाद्या महिलेचा पाठलाग करणे, हा गुन्हा आहे आणि अशा गुन्ह्याला निश्चित शिक्षा करण्यात आलेली आहे. गुन्हा प्रथमच केला असेल, तर ३ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, तर दुसर्‍या गुन्ह्यासाठी ५ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. या शिक्षेसमवेत दंडही ठोठावला जाऊ शकतो. जर एखाद्या महिलेने कोणत्याही पुरुषाला स्पष्टपणे तिची असहमती दर्शवली असेल आणि तरीही तो पुरुष तिचा पाठलाग करत असेल किंवा ‘तिचा मानसिक छळ होईल’, असे वागत असेल, तर त्याला गुन्हेगार मानले जाईल. हेच सगळे ‘इंटरनेट’ किंवा ‘ई-मेल’ अथवा भ्रमणभाष यांच्या वापरातून घडत असेल, तरी त्याला छळवणूक मानले जाईल. या सुधारित कायद्यानुसार एखाद्या महिलेला एखाद्या पुरुषाकडून दूरभाष, संदेश, ‘व्हॉट्सॲप कॉल’, व्हॉट्सॲप संदेश, फेसबूक कॉल, फेसबूक संदेश येणे, तिची इच्छा नसतांना विविध ‘सिम्बॉल’ (चिन्हे) पाठवणे, याचा अर्थ तिचा ‘ऑनलाईन’ पाठलाग करणे असा आहे. हे कलम अस्तित्वात आणल्यानंतर याविषयी बरीच चर्चा झाली. या वेळी ‘केवळ महिलांचाच पाठलाग होतो का ?’, असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात आला. या कायद्यानुसार ‘पुरुष हाच आरोपी असू शकेल’, अशी तरतूद असल्यामुळे ‘ती समानतेच्या तत्त्वाला बाधा आणणारी आहे’, असेही मत काही जणांनी मांडले. असे असले, तरी या पाठलागाचे सर्वांत अधिक गुन्हे महिलांच्या संदर्भात घडतात, हे सत्य आपण नाकारू शकत नाही.

३. ‘स्टॉकिंग’कडे महिला वा पुरुष यांनी दुर्लक्ष करू नये !

‘स्टॉकिंग’ या गुन्ह्याविषयी सांगायचे झाले, तर कुठल्याही मोठ्या गुन्ह्याची प्राथमिक पायरी म्हणजे पाठलाग असतो. त्यामुळे कुठल्याही ‘स्टॉकिंग’कडे महिला किंवा पुरुष यांनी दुर्लक्ष करणे, हे हिताचे नाही. जर आरोपीकडून होणार्‍या त्रासाविषयी कुठे तक्रार केली नाही, तर तो पाठलाग आपणास सुखावत असल्याची भावना आरोपीच्या मनात येऊन अपसमज निर्माण होऊ शकतो. यातून मोठा गुन्हा घडण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळच्या वेळी अशा गोष्टी जर प्रथमदर्शनी निदर्शनास आल्या, तर त्या बंद करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आवश्यकता वाटल्यास यासंबंधी पोलिसांत तक्रार केली पाहिजे.

४. ‘सायबर स्टॉकिंग’द्वारे संबंधितांना ‘ब्लॅकमेल’ करणे

‘सायबर स्टॉकिंग’मध्ये कधी कधी स्वत:ची करमणूक करण्यासाठी, तर कुणाची फसवणूक करण्यासाठी, तर कधी कधी माहिती गोळा करण्यासाठी ‘ऑनलाईन’ पाठलाग केला जातो. (अशी माहिती विकून पैसे कमावणे, हा व्यवसाय आहे.) विविध संघटना आणि ‘कॉर्पाेरेट’ संस्था कधी कधी त्यांच्या अंतर्गत गुप्ततेसाठी किंवा इतर गोष्टींसाठी त्यांचे कर्मचारी अथवा ग्राहक यांचे ‘सायबर स्टॉकिंग’ करतात. अनेक प्रकरणांमध्ये असे लक्षात आले की, एखादी व्यक्ती कोणकोणत्या संकेतस्थळांवर जाऊन भेट देते, याची माहिती आरोपी मिळवतो. या माहितीच्या आधारे संबंधिताला ‘ब्लॅकमेल’ करण्यात येते. ही माहिती सार्वजनिक न करण्यासाठी पैशांची मागणीही करण्यात येत असल्याचे प्रकार घडतात.

५. सामाजिक माध्यमे वापरतांना ‘प्रायव्हसी’ची ‘सेटिंग’ करून ठेवणे आवश्यक !

सर्वसाधारणपणे काही लोकांकडून खासगीरित्या संकेतस्थळांवर अश्लील साईट्स, डेटिंग साईट्स, फ्रेंडशिप साईट्स, चॅटिंग ॲप इत्यादींचा शोध (सर्चिंग) घेतला जातो. या ‘चॅटिंग’विषयी इतरांना कळू नये, अशी सगळ्यांची इच्छा असते. याचाच अपलाभ ‘स्टॉकर्स’ घेत असतात. इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आपला ‘वेब कॅमेरा’ हॅक करणे, ‘टीम व्ह्यूवर’च्या साहाय्याने आपल्या संगणकावर नियंत्रण मिळवणे, कुठलेही ‘सॉफ्टवेअर’ किंवा विषाणू (व्हायरस) आपल्या संगणकामध्ये सोडणे, या मार्गाने ‘सायबर स्टॉकिंग’ होत असते. असे प्रकार टाळण्यासाठी सामाजिक माध्यमे वापरतांना ‘प्रायव्हसी’ची (खासगी) ‘सेटिंग’ करून ठेवायला हवी. तसे केल्यास आपली इच्छा असेल, तीच व्यक्ती आपल्या ‘पोस्ट’ किंवा ‘वॉल’ पाहू शकेल. प्रक्षोभक आणि अनावश्यक गोष्टी ‘पोस्ट’ करणे टाळणे, अनोळखी लोकांच्या ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ सामाजिक माध्यमांवर न स्वीकारणे, तुमचे ‘लोकेशन’ (ठिकाण) इतरांना कळू नये, याची काळजी घेणे, ‘पासवर्ड’ (संकेतांक) ‘स्ट्राँग’ असले पाहिजेत, याची दक्षता बाळगणे, हे ‘स्टॉकिंग’ टाळण्याचे उपाय आहेत. आवश्यकता नसतांना ‘वेब कॅमेरा’ झाकून ठेवा. अनोळखी क्रमांकावरून किंवा खात्यावरून आलेल्या ‘लिंक’वर ‘क्लिक’ करू नका. संशयास्पद असलेल्या खात्यांना  ‘ब्लॉक’ करा. असे केल्यास आपल्याला कुणी फसवू शकणार नाही.’

– अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, विशेष सरकारी अधिवक्ता, मुंबई