श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे १३ जुलैला त्यागपत्र देणार !

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर आंदोलनकर्त्यांनी नियंत्रण मिळवल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात पैसे सापडले आहेत. दुसरीकडे राजपक्षे यांनी १३ जुलै या दिवशी पदाचे त्यागपत्र देण्याची घोषणा केली आहे. ते सध्या नौदलाच्या एका जहाजावर वास्तव्य करत असल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर मंत्री धम्मिका परेरा, हिरेन फर्नांडो आणि मनुषा नयकारा यांनीही त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. सैन्यदलप्रमुख शैवेंद्र सिल्व्हा यांनी देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जनतेला संरक्षण दल आणि पोलीस यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलकांनी ९ जुलैच्या रात्री पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे निवासस्थान पेटवले. त्यानंतर विक्रमसिंघे यांनी तातडीने त्यांच्या पदाचे त्यागपत्र देण्याची घोषणा केली होती. पोलिसांनी देशातील ढासळती कायदा आणि सुव्यवस्था पाहून अनेक प्रांतात संचारबंदी लागू केली आहे.