‘झी न्यूज’चे पत्रकार रोहित रंजन यांना उत्तरप्रदेशात जाऊन अटक करण्याचा छत्तीसगड पोलिसांचा प्रयत्न

राहुल गांधी यांच्याविषयीचे चुकीचे वृत्त प्रसारित केल्याचे प्रकरण

  • उत्तरप्रदेश पोलिसांकडून विरोध

  • चुकीच्या वृत्तासाठी रोहित रंजन आणि ‘झी न्यूज’ने मागितली होती क्षमायाचना !

‘झी न्यूज’चे पत्रकार रोहित रंजन

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – ‘झी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीवरील ‘डी.एन्.ए.’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी चुकीचे वृत्त प्रसारित केल्यावरून छत्तीसगड येथे पत्रकार रोहित रंजन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यासाठी छत्तीसगड पोलीस येथे त्यांच्या घरी पहाटे पोचल. ते सर्वजण साध्या वेशात होते, तसेच त्यांनी नियमाप्रमाणे याविषयी स्थानिक पोलिसांना कल्पनाही दिली नाही. यामुळे रोहित रंजन यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना ट्वीट करून याविषयी माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी त्यांच्या घरी पोचले. त्यांनी रंजन यांना अटक करून छत्तीसगड येथे नेण्यास विरोध केला. सायंकाळपर्यंत हे प्रकरण चालू होते.

१. रोहित रंजन आणि ‘झी न्यूज’ यांनी राहुल गांधी यांच्याविषयीचे चुकीचे वृत्त प्रसारित केल्यावरून त्यांच्या वाहिनीवरून क्षमायाचना केली होती. तरीही छत्तीसगड येथे त्यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक गुन्हा नोंदवण्यात आल्याचे ‘झी न्यूज’कडून सांगण्यात येत आहे.

२. छत्तीसगड पोलिसांचे म्हणणे आहे की, अन्य राज्यात जाऊन कुणाला अटक करायची असेल, तर स्थानिक पोलिसांना कल्पना देण्याचा कोणताही नियम नाही, तरीही त्यांना कल्पना दिली जाते. तसेच आम्ही रंजन यांना त्यांच्या अटकेचा न्यायालयाने बजावलेला आदेशही दाखवला. त्यामुळे त्यांनी सहकार्य करणे अपेक्षित होते. न्यायालयाचा मान राखून चौकशीत साहाय्य करायला हवे होते.

३. रोहित रंजन यांच्या समर्थनार्थ ट्विटरवरून लोकांनी ‘#IsupportRohitRanjan या ‘हॅशटॅग’च्या (एका विषयावर केल्या जाणार्‍या चर्चेच्या) माध्यमातून ट्विटर ट्रेंड केला. तो अनेक घंटे प्रथम क्रमांकावर होता.