भटकळ नगरपरिषदेच्या इमारतीवरील उर्दू भाषेतील फलक अंततः हटवला !

भटकळ (कर्नाटक) – येथील नगरपरिषदेच्या इमारतीवर उर्दू भाषेतील आलेला फलक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंततः हटवण्यात आला. या वेळी भटकळ नगरपरिषदेचे अध्यक्ष परवेज काशीमजी आणि उर्दू भाषिक नगरसेवक यांनी फलक हटवण्याच्या घटनेचा निषेध केला.

भटकळ नगरपरिषदेच्या इमारतीच्या रंगरंगोटीनंतर कन्नड, इंग्रजी आणि उर्दू या ३ भाषांत फलक लावण्यात आले होते. ही गोष्ट भटकळ येथील कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच उर्दू फलक तातडीने हटवण्याची मागणी करण्यात आली; परंतु उर्दू भाषिकांनी ‘कोणत्याही परिस्थितीत फलक हटवू देणार नाही’, अशी भूमिका घेतली. उर्दू फलकाच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरलेल्या उर्दू भाषिकांनी नगरपरिषद इमारतीकडे धाव घेऊन तिला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे भटकळमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे जिल्हाधिकारी मलई मुगीलन् यांनी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. सुमन पेडणेकर, भटकळचे साहाय्यक आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी  नगरपरिषदेचे अध्यक्ष, नगरसेवक आणि भटकळ येथील मुसलमानांची सर्वोच्च संस्था ‘तंजीम’च्या नेत्यांसमवेत बैठक घेतली. जिल्हाधिकार्‍यांनी सरकारी इमारतीवरील फलक कन्नड आणि इंग्रजी वगळता अन्य भाषांमध्ये लिहिण्यास वाव नाही, असे पटवून दिले. त्यानंतर मुगीलन् यांनी मुख्याधिकारी एम्.के. सुरेश यांना इमारतीवरील उर्दू फलक हटवण्याचा आदेश दिला.