हरियाणातील च्यवन ऋषि यांच्या धार्मिक स्थळातून भगवान विष्णूंच्या अष्टधातू मूर्तीची चोरी !

  • हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

  • ५ हिंदूंनीच मूर्ती चोरल्याचा आरोप !

चंडीगड (हरियाणा) – राज्यातील नारनौल येथील धोसी धाम या ऐतिहासिक धार्मिक स्थळातून भगवान श्रीविष्णूंची अनुमाने ३० किलो वजनाची अष्टधातूची मूर्ती चोरीला गेली आहे. यासमवेतच पितळेचे लड्डू गोपाळ आणि विष्णूंची आणखी एक मूर्तीही चोरीला गेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजय, मोहन, रामसिंह यांच्यासह ५ हिंदूंवर गुन्हा नोंदवला आहे. पूजेचे कारण देत ते येथे थांबले आणि मूर्ती चोरून पळून गेले, असा त्यांच्यावर आरोप आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नारनौल शहराच्या पश्‍चिमेला अनुमाने ८ किलोमीटर अंतरावर धोसीच्या डोंगरावर च्यवन ऋषि यांचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. च्यवन ऋषि यांची प्रतिमा पहाण्यासाठी लोक दूरदूरहून येथे येतात.

मंदिरात थांबलेल्या लोकांवर चोरीचा संशय !

यासंदर्भात धोसी धामचे प्रमुख नरसिंह दास म्हणाले, ‘‘२४ जूनला बडगाव मंदिरात अजय, मोहन, रामसिंह, तसेच अन्य दोघे उपस्थित होते. यांनीच मूर्ती चोरल्याचा मला पूर्ण संशय आहे !’’ यासह ‘आरोपींना अटक करून भगवान श्रीविष्णूची अष्टधातूची मौल्यवान मूर्ती जप्त करून आरोपींवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी महंतांसह परिसरातील भाविकांनी पोलिसांकडे केली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूच मंदिरातील देवतांच्या मूर्ती चोरत असतील, तर यातून त्यांच्यात धर्माप्रती अभिमान नसल्याचेच दिसून येते. अन्य धर्मीय कधी त्यांच्या श्रद्धास्थानी असे कृत्य करतात का ? हिंदूंसाठी हे लज्जास्पद !