दक्षिण आफ्रिकेच्या नाईट क्लबमध्ये सापडले २१ विद्यार्थ्यांचे मृतदेह !

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) – येथील एका नाईट क्लबमध्ये २१ विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शाळेच्या परीक्षा संपल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी हे विद्यार्थी या क्लबमध्ये गेले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृत विद्यार्थ्यांचे वय १३ ते १७ वर्षे आहे.

१. एका पोलीस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या मुलांच्या शरिरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात हे मृत्यू विषामुळे झाल्याचे दिसून येत आहे. आम्ही असेही गृहीत धरत आहोत की, कदाचित् काही कारणाने चेंगराचेंगरी झाली असेल, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असेल.

२. एका अधिकार्‍याने सांगितले की, केवळ १८ वर्षांवरील व्यक्तीला मद्य पिण्याची अनुमती आहे. अशा परिस्थितीत शाळेतील मुले क्लबमध्ये असणे प्रश्‍न निर्माण करणारे आहे. लोक कधीकधी कायद्याचे पालन करत नाहीत. दारू परवान्यांशी संबंधित कायद्यात पालट करण्याविषयी प्रशासन चर्चा करणार आहे.

३. प्रांताचे पंतप्रधान ऑस्कर माबुयाने म्हणाले की, दारुचे सेवन करणे धोकादायक आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात उघडपणे दारुची विक्री करणे चुकीचे आहे.