नम्र, पुढाकार घेऊन सेवा करणार्‍या आणि सेवेची तळमळ असलेल्या पुणे येथील कु. सिद्धी पढीयार !

पुणे येथील कु. सिद्धी पढीयार या ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या संकेतस्थळावर ‘अपलोडिंग’ची सेवा करतात. कु. सिद्धी त्यांना दिलेल्या सेवा पुष्कळ तळमळीने आणि पुढाकार घेऊन करतात. त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सहजता आणि प्रेमभाव

कु. सिद्धी पढीयार

‘कु. सिद्धीताईंच्या बोलण्यात सहजता, नम्रता आणि प्रेमभाव जाणवतो.’ – श्री. संतोष नान्नीकर, पुणे आणि श्री. मनोज कात्रे, पुणे

प्रत्येकाच्या स्तराला जाऊन त्याला समजावण्याची हातोटी

‘त्या सत्संगांत सेवेसंबंधीचा विषय अतिशय सोप्या भाषेत शिकवतात. त्या ‘प्रत्येक साधकाला तो विषय समजेल’, अशा प्रकारे शिकवतात. त्यांना शिकवण्याची कला चांगल्या प्रकारे अवगत आहे. त्यांच्यात ‘प्रत्येकाच्या स्तराला जाऊन समजावण्याची हातोटी आहे’, असे जाणवते.’ – श्री. संपत जाखोटिया, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

आस्थापनाच्या मालकांचा विश्वास संपादन करणे; मात्र ‘साधना आणि सेवा करता यावी’, यासाठी आस्थापनाचे दायित्व न घेणे

‘सिद्धीताई कार्यालयीन काम प्रामाणिकपणे आणि चोखपणे करतात. त्या व्यवस्थापक (मॅनेजर) आहेत. त्यांनी आस्थापनाच्या मालकांचे मन जिंकले आहे. मालक वयस्कर असून त्यांना ‘संपूर्ण आस्थापनाचे दायित्व सिद्धीताईंना द्यायला हवे’, असे वाटते. त्यांनी अनेक वेळा सिद्धताईंकडे तसे करण्याचा आग्रह धरला होता; परंतु सिद्धीताईंनी ते नम्रपणे नाकारले. त्या संदर्भात सिद्धीताईंनी मला सांगितले, ‘‘दायित्व घेतले, तर मला सेवा आणि साधना करण्यासाठी वेळच मिळणार नाही.’’ – श्री. विक्रम डोंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

चुका लगेच स्वीकारून त्यावर प्रायश्चित्त घेणार्‍या आणि अंगी साधकत्व असलेल्या सिद्धी !

‘सिद्धीताईंना त्यांच्या सेवेतील चुका लक्षात आणून दिल्यास ताई त्या लगेच स्वीकारून त्यावर प्रायश्चित्त घेतात. त्यांच्याकडून ‘व्यष्टी साधनेचे गांभीर्य, अंतर्मुखता, चुकांविषयीची संवेदनशीलता, प्रांजळपणे चुका स्वीकारणे’ आदी दैवी गुण शिकायला मिळतात. त्यांच्या बोलण्यात कधीही अहं जाणवत नाही.’ – श्री. संपत जाखोटिया, श्री. मनोज कात्रे आणि श्री. विलास इंदोलीकर

नेहमीच्या सेवेव्यतिरिक्त अधिकची दिलेली सेवाही आनंदाने करणे

‘सिद्धीताईंना ‘नेहमीच्या सेवेसह अतिरिक्त सेवा करू शकणार का ?’, असे विचारल्यावर त्या नेहमी सिद्ध असतात. त्या कोणतेही गार्‍हाणे न सांगता सेवा करतात. त्यांची प्रसंगी रात्री जागून सेवा करण्याची सिद्धता असते. त्यांना कार्यालयात कितीही काम असले, तरी गेल्या अनेक वर्षांत त्यांच्या सेवेत कधीच खंड पडलेला नाही. त्या प्रतिदिन तेवढ्याच उत्साहाने आणि भाव ठेवून सेवा करतात.’ – श्री. संपत जाखोटिया, श्री. संतोष नान्नीकर आणि श्री. मनोज कात्रे

पुढाकार घेऊन सेवा करणे

‘सिद्धीताई ‘ऑनलाईन’ सत्संगात विषय सांगण्यासाठी सदैव सिद्ध असतात. गेल्या काही मासांपासून त्या पुढाकार घेऊन सेवा करत आहेत. काही वेळा अन्य साधकांना सत्संगात सूत्रे सांगायला अडचण असेल, तर सिद्धीताई तो विषय समजून घेऊन सूत्रे सांगण्यासाठी लगेच सिद्ध होतात. ताईंना कधी काही अडचण असली, तरी ‘त्यावर कशा प्रकारे मात करता येईल ? आणि सत्संग घेता येईल ?’, असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्यात समष्टी भाव जाणवतो आणि सर्वांना त्यांचा आधार वाटतो.’ – श्री. विक्रम डोंगरे आणि श्री. मनोज कात्रे

(सर्व सूत्रांचा दिनांक १.१.२०२२)