उत्तरप्रदेशमध्ये ईदच्या दिवशी प्रथमच रस्त्यावर नमाजपठण झाले नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (डावीकडे)

लक्ष्मणपुरी – राज्यात ईद आणि ‘अलविदा जुमा’ (रमझानचा शेवटचा दिवस) यांदिवशी प्रथमच रस्त्यावर नमाजपठण झाले नाही, अशी माहिती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, ‘‘उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार आल्यापासून ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाजपठण करणे बंद झाले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यात श्रीरामनवमीच्या दिवशीसुद्धा हिंसाचार झाला नाही. यापूर्वी मुझफ्फरनगर, मेरठ, मुरादाबाद आणि इतर ठिकाणी दंगली होत होत्या. तेथे कित्येक मास संचारबंदी लागू करावी लागत होती; पण संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये वर्ष २०१७ पासून दंगलीची एकही घटना घडलेली नाही.

आमच्या सरकारने राज्यातील बेकायदेशीर पशूवधगृहे बंद केली आहेत. गायींना निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही गोशाळा बांधल्या आहेत. आम्ही धार्मिक स्थळांवरून ध्वनीक्षेपक हटवले आहेत. यासह आमच्या सरकारने जवळपास ७०० धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी केली आहे.’’

संपादकीय भूमिका

स्वतःलाही असे अभिमानाने सांगता येईल, अशी वेळ किमान भाजपशासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तरी आणली पाहिजे !