चीनची मतपरिवर्तनाची रणनीती !

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. भारतियांचे मतपरिवर्तन करण्यासाठी चीनने भारतातील महत्त्वाच्या घटकांच्या माध्यमांतून मोहिमा राबवण्याचा प्रयत्न करणे !

‘सध्या चीन मोठ्या प्रमाणावर ‘इन्फ्लुअन्स ऑपरेशन’चा (प्रभावी मोहीम) वापर करून भारतियांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून ‘चीन हा कसा चांगला देश आहे, चीनशी वाटाघाटी करा आणि चीनशी व्यापार करा, सीमाप्रश्नावर अधिक लक्ष देऊ नका, दोन्ही देशांतील व्यापार वाढणे, हे भारतासाठी हितकारक आहे’, असे चीनला भारतियांना सांगायचे आहे. भारताने चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ (आशिया, आफ्रिका आणि युरोप यांना चीनला जोडण्यासाठीची योजना) या प्रकल्पाला विरोध करणे सोडून देऊन या प्रकल्पात सहभागी व्हावे, भारताने अमेरिकेच्या जवळ जाऊ नये, त्याऐवजी चीनचे म्हणणे ऐकावे, हा या ‘इन्फ्लुअन्स ऑपरेशन’चा प्रमुख उद्देश आहे. यासाठी चीनकडून भारतातील महत्त्वाच्या घटकांमध्ये विविध पद्धतीने मतपरिवर्तनाच्या मोहिमा राबवल्या जात आहेत. यात सर्वांत महत्त्वाचा घटक, म्हणजे देशातील माध्यमे, वर्तमानपत्रे, दृकश्राव्य माध्यमे, सामाजिक माध्यमे आणि भारतातील चित्रपटसृष्टी आहे. भारतातील विचारमंच (थिंक टँक) किंवा ‘एन्.जी.ओ.’ (सामाजिक संस्था) यांना चीन त्याच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासमवेतच चीनची वकालत भारतियांशी विविध पद्धतीने संवाद साधून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत असते.

२. चीन विविध माध्यमांतून भारताला घेरण्याचा प्रयत्न करत असल्याने भारतीय सुरक्षेला धोका निर्माण होणे

चीनने जगभरात आणि भारतातही ‘कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट’ (चीनमधील कन्फ्युशियस धर्माचा उपदेश देणार्‍या संस्था) चालू केल्या आहेत. चीन सामाजिक माध्यमांचा (सोशल मिडियाचा) प्रचंड अपवापर करून लोकांचे मतपरिवर्तन करत आहे. भारतातील मोठ्या उद्योजकांमध्ये चीनविषयीचे मत अनुकूल करण्याचा सतत प्रयत्न चालू असतो. यातून ‘चीनच्या कच्च्या मालाविना किंवा चीनशी व्यापार करण्याविना भारतातील व्यापार्‍यांना आता गत्यंतर उरलेले नाही’, असे विचार चीनकडून सातत्याने उद्योजकांवर बिंबवले जातात. चीनकडून भारतीय भूमीच्या सीमांमधून मोठ्या प्रमाणावर अवैध व्यापार केला जातो. तसेच म्यानमार आणि नेपाळ यांच्याशी जोडलेल्या भारतीय सीमांच्या माध्यमातून चीनची मोठ्या प्रमाणावर तस्करीही चालू असते. अशा विविध माध्यमांतून चीन भारताला घेरण्याचा आणि त्याची कोंडी करण्याचा अविरत प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

३. भारतातील विद्यार्थी, शिक्षक, ‘एन्.जी.ओ.’, विचारमंच आणि परिषदा यांच्या माध्यमांतून चीनने भारतियांच्या मतपरिवर्तनाचा प्रयत्न करणे  !

चीनने त्याच्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा नियम सिद्ध केलेला आहे. त्यानुसार कोणताही चिनी नागरिक कोणत्याही कामासाठी भारतात आल्यास त्याला हेरगिरी करण्याचे काम दिले जाते. तो नागरिक विद्यार्थी, व्यापारी किंवा पर्यटकही असू शकतो. भ्रमणभाषसंचातील विविध ‘ॲप्स’च्या माध्यमातून चीन हेरगिरी करत असतो. त्या माध्यमातून चीनचे ‘इन्फ्युशियस ऑपरेशन’ चालू असते. जगातील प्रसिद्ध ५४८ विविध विश्वविद्यालयांमध्ये चीनने घुसखोरी केलेली आहे. यात भारताच्या ५ महत्त्वाच्या विश्वविद्यालयांचाही समावेश आहे. चीनच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, तर शिक्षकांना सहलीसाठी चीनला पाठवले जाते. या माध्यमातून त्यांच्यावर चीनची विचारसरणी कशी जगासाठी उपकारक आहे, हे बिंबवले जाते. थोडक्यात त्यांना चीनधार्जिणे बनवले जाते. दुर्दैवाने यात त्याला यश मिळत आहे. याविषयी अमेरिकेतील ‘रँट कॉर्पाेरेशन’ने एक अहवाल प्रकाशित केला आहे, तसेच भारतातील ‘लॉ अँड सोसायटी अलायन्स’ या संस्थेनेही प्रदीर्घ अभ्यास केला आहे. भारत-चीन संबंध वाढवण्याच्या गोंडस नावाखाली देशातील अनेक खासगी विश्वविद्यालये आणि विचारमंच यांना चीनकडून आर्थिक साहाय्य दिले जाते. त्यामुळे हे विचारमंच सातत्याने चीनच्या बाजूने मते मांडत असतात. देहलीतील काही विचारमंच चीनच्या बाजूने संशोधन करून अहवाल बनवतात. चीनची भारतातील वकालत विविध ‘एन्.जी.ओ.’च्या (स्वयंसेवी संस्थांच्या) साहाय्याने विविध परिषदा आयोजित करते. त्यातूनही लोकांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो.

४. ‘ऑनलाईन’ शिक्षण आणि ‘कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट’ किंवा ‘प्रो-चायनीज स्टडी सर्कल’ यांच्या माध्यमातून मुलांना चीनधार्जिणे बनवण्याचा प्रयत्न !   

दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ शिक्षणाचे पेव फुटले. या उद्योगातही चीनने घुसखोरी करून १२ ते १४ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून तो त्याला अनुकूल अशी माहिती भारतीय विद्यार्थ्यांच्या डोक्यात आणि मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत असतो. चीन ‘कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट’ किंवा ‘प्रो-चायनीज स्टडी सर्कल’ या माध्यमातून केवळ अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.

५. भारताने चीनच्या धोकादायक रणनीतीच्या विरोधात अत्यंत सावधपणे लढणे आवश्यक !

भारताने मागील वर्षी कठोर भूमिका घेऊन देशातील अशा ‘कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट’ बंद करण्याचा प्रयत्न केला होता. आता चीन असा दावा करत आहे की, त्यांच्या ‘कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट’ सरकारच्या हाताखाली नसून खासगी संस्थांच्या हाताखाली आहेत. त्यामुळे त्या परत उघडण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्याला भारताने बळी पडू नये; कारण या संस्थांच्या माध्यमातून चीन त्यांचे संरक्षण शास्त्रज्ञ आणि अन्य रणनीतीकार भारतात पाठवून गुप्त माहिती काढण्याचा प्रयत्न करील. ही एक प्रकारची युद्धनीती आहे. या माध्यमातून शत्रूदेशाशी (भारताशी) समोरासमोर न लढता त्यांचे विचारवंत, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात स्वराष्ट्राच्या विरोधात विचारबीजे पेरायची अन् ‘त्यांचे राष्ट्र कसे कुचकामी आहे’, याची त्यांना सतत जाणीव करून देत रहायची. त्याच वेळी ‘चीन हे राष्ट्र कसे बलशाली आहे’, हेही पटवून द्यायचे. ही या युद्धनीतीची कार्यप्रणाली आहे. २१ व्या शतकातील या धोकादायक रणनीतीच्या विरोधात भारताने अत्यंत सावधपणे लढाई करण्याची आवश्यकता आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे. (साभार : ‘महासत्ता’)

संपादकीय भूमिका

चीनच्या युद्धनीतीची कार्यप्रणालीच्या विरोधात  रणनीती आखून भारताने त्याला काटशह द्यायला हवा !