पोलिसांनी कारवाई न केल्याने आदिवासींचा पोलीस ठाण्यावर मोर्चा !

बुलढाणा येथे मारहाणीत युवकाचा मृत्यू !

प्रतिकात्मक छायाचित्र

बुलढाणा – जिल्ह्यातील हडीयामहल येथे युवकाची हत्या करण्यात आली. त्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी सोनाला पोलीस ठाण्यावर १९ मे या दिवशी मोर्चा काढून ठाण्याला घेराव घातला. पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला; मात्र आदिवासींनी ‘कारवाई होईपर्यंत हटणार नाही’, अशी भूमिका घेतली. आदिवासींनी तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई केली नव्हती.

४ दिवसांपूर्वी विवाह समारंभात नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरून रवि वास्केला या युवकाला काही जणांनी लाठ्यांनी मारहाण केली होती. रुग्णालयात उपचार चालू असतांना रवि याचा मृत्यू झाला. मारहाणीची तक्रार दिल्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त झालेले आदिवासी बांधव पोलीस ठाण्याच्या ठिकाणी आले.

संपादकीय भूमिका

आदिवासी बांधवांना असे आंदोलन का करावे लागते ? अशा कर्तव्यचुकार पोलिसांनाच कारागृहात डांबण्याची मागणी केल्यास चूक ते काय ?