चिनी नागरिकांवरील आक्रमणांमुळे पाकमध्ये बलुची विद्यार्थ्यांचा छळ !

बलूच विद्यार्थ्यांची निदर्शने

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘व्हॉइस फॉर बलूच मिसिंग पर्सन्स’ (व्हीबीएम्पी) या मानवी हक्क संस्थेच्या म्हणण्यानुसार गेल्या ३ दशकांत ६ सहस्रांहून अधिक बलुची लोकांचे अपहरण झाले आहे. त्यांच्याविषयी आतापर्यंत काहीही माहिती मिळू शकलेली नाही. वर्ष २००९ पासून आतापर्यंत १ सहस्र ४०० बलूच नागरिकांचे मृतदेह आढळून आले आहेत. पाकमध्ये गेल्या काही दिवसांत चिनी नागरिकांवरील आत्मघाती आक्रमणांनंतर बलूच समुदायावर दडपशाही करणे चालू झाले आहे. बलूच लोकांचे सुरक्षा यंत्रणेद्वारे अपहरण केले जात आहे. काही दिवसांपूर्वी लाहोर पोलिसांकडून पंजाब विद्यापिठातील वसतीगृहात रहाणाऱ्या काही बलूच विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मामा कादीर म्हणाले की, २ वर्षांत २८७ बलूच नागरिकांचे अपहरण झाले आहे.

१. लोक बेपत्ता होण्यामागे पाकिस्तानी सैन्य आणि पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. असल्याचा आरोप मानवी हक्क संघटना, पीडित कुटुंब अन् नातेवाईक यांच्याकडून केला जात आहे. त्यांच्याविरोधात आंदोलनेही केली जात आहेत. बलुचिस्तान विद्यार्थी परिषदेने केलेल्या आवाहनानंतर लाहोेर, कराची, फैसलाबाद, इस्लामाबादसह प्रमुख शहरांतील बलूच विद्यार्थ्यांनी साथ देत आंदोलन चालू केले आहे. ते रस्त्यावर उतरून निदर्शने करत असून बलूच विद्यार्थ्यांच्या विरोधातील अभियान तात्काळ थांबवण्याची त्यांची मागणी आहे.

२. बलुचिस्तान विद्यार्थी परिषदेचे सदस्य जहीर बलूच म्हणाले की, आमचा आत्मघाती किंवा आतंकवादी आक्रमणांशी काहीही संबंध नाही. दडपशाहीच्या कारवाईमुळे सहस्रो विद्यार्थी ईदसाठी घरी जाऊ शकले नाहीत.

३. अनेक मासांपासून अपहृत विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी बलूच विद्यार्थी निदर्शने करत आहेत; परंतु पाक सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

संपादकीय भूमिका

बलुची लोकांचा गेली ७४ वर्षे पाककडून छळ केला जात आहे. छळ करण्यासाठी पाकला काहीतरी कारणच हवे आहे. आता चिनी नागरिकांवरील आक्रमणांचे कारण त्याला सापडले आहे. याविषयी जागतिक मानवाधिकार संघटना मात्र मौन आहेत, हे लक्षात घ्या !