‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन’ राज्यस्तरीय पुरस्कारांचे १६ मे या दिवशी वितरण !

प.पू. गजानन कस्तुरे यांना आध्यात्मिक, तर डॉ. अरुण मोरे यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार

योगतज्ञ दादाजी वैशंपायन

प.पू. दादाजी वैशंपायन यांच्यामूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा !

‘गुरुदत्त’ संस्थेने दत्त सांप्रदायिक साधक परिवार आणि भक्त यांच्या आर्थिक योगदानातून सुमारे ३५ लाख रुपये खर्चून बांधलेल्या ध्यानमंदिरात पाच लाख रुपये खर्चाच्या योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या संगमरवरी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सकाळी ११ वाजता होणार आहे. पुरस्कारार्थी प.पू. गजानन कस्तुरेगुरुजी यांचे शुभहस्ते हा सोहळा पार पडेल. या निमित्ताने वेदशास्त्रसंपन्न ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात होमहवन, यज्ञ आदी धार्मिक कार्यक्रमही करण्यात येतील.

शेवगाव – नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील ‘गुरुदत्त सामाजिक संस्थे’च्या वतीने प्रतीवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘राज्यस्तरीय योगतज्ञ दादाजी वैशंपायन आध्यात्मिक’ पुरस्कारासाठी यंदा नाशिक येथील प.पू. काकासाहेब उपाख्य गजानन कस्तुरेगुरुजी यांची, तर ‘सामाजिक कार्य गौरव’ पुरस्कारासाठी पुणे येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उच्च रक्तदाब आणि हृदयविकार तज्ञ डॉ. अरुण मोरे यांची निवड झाली आहे. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या १०३ व्या जयंतीदिनी (बुद्ध पौर्णिमा) म्हणजेच १६ मे या दिवशी येथील श्रीदत्त देवस्थानात दुपारी साडेतीन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रत्येकी ११ सहस्र रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सकाळी ११ वाजता योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळाही मंगलमय वातावरणात पार पडेल. संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके आणि सचिव फुलचंद रोकडे यांनी ही माहिती दिली.

प.पू. कस्तुरेगुरुजींनी प्राणायाम, अष्टांगयोग साधना, तसेच जन्मकुंडली यांच्या माध्यमातून अनेकांच्या दुःखांचे निराकरण केले असून योगकार्य आणि गर्भसंस्कार यांतही त्यांचे मोठे योगदान आहे. डॉ. मोरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यामुळे निवड समितीने पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.