एस्.एस्.आर्.एफ.च्या विदेशातील साधकांना साधना करतांना येणाऱ्या अडचणी

विदेशातील साधकांना साधना करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे अशा स्थितीतही तेथील साधक चिकाटीने अन् तळमळीने साधना करत आहेत. ‘त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते ?’, हे पुढे दिले आहे. यातून ‘भारतात साधना करण्यासाठी किती अनुकूल वातावरण आहे !’, हे लक्षात येते.

१. श्री. ए. नाज, युरोप

१ अ. कार्यालयात कापराचे उपाय करता न येणे : ‘कार्यालयातील काही सहकाऱ्यांना कापराचा सुगंध आवडत नसल्याने तेथे कापराचे उपाय करणे कठीण जाते. दुपारी जेवणाच्या सुटीत मी बाहेर जाऊन कापराचे उपाय करतो आणि नंतर कार्यालयातील प्रसाधनगृहात तोंडवळा धुतो. ‘कापराचा सुगंध येऊ नये’, यासाठी मी सात्त्विक सुगंध असलेले अत्तर (पर्फ्युम) लावतो.

१ आ. घरात सात्त्विक उदबत्ती आणि धूप लावू न शकणे : मी घरात सात्त्विक उदबत्ती आणि धूप लावल्यावर मला शेजाऱ्यांकडून तक्रारीचे पत्र मिळाले. त्यामुळे मी धूप वापरणे बंद केले. मी घरात सात्त्विक उदबत्ती लावण्यापूर्वी सर्व खिडक्या बंद करून घेतो. घराची शुद्धी करण्यासाठी धूप न वापरता मी विभूतीच्या पाण्याने घराची शुद्धी करतो.’

२. श्री. लोरेन्झो रवासी, इटली

२ अ. लोकांना अध्यात्माविषयी सांगता न येणे : ‘अध्यात्माविषयी थोडीफार रुची असणाऱ्या लोकांशी त्याविषयी बोलू शकतो; पण त्यांतील बरेच जण त्यांच्या श्रद्धास्थानांकडे विषय वळवतात. त्या वेळी ते स्वतःच्या मतांवर ठाम असतात, म्हणजे ‘त्यांना जे ठाऊक आहे, तेच सत्य आहे’, असे सांगून नवीन गोष्टींना सामोरे जाण्यापासून ते स्वतःला दूर ठेवतात. त्यांची नवीन काहीतरी शिकण्याची सिद्धता नसते किंवा ते काहीतरी कारणे सांगतात.’

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक