यजमानांच्या मृत्यूनंतर यवतमाळ येथील साधिका श्रीमती धनश्री देशपांडे यांनी संत आणि साधक यांच्या माध्यमातून वेळोवेळी अनुभवलेली श्री गुरूंची कृपा !

श्रीमती धनश्री देशपांडे

मागील भागात ‘श्री. रवींद्र यांचे निधन झाल्यावर त्यांची पत्नी श्रीमती धनश्री यांनी गुरुचरणी सातत्याने प्रार्थना करून स्वतःला कसे स्थिर ठेवले ?’, ते पाहिले. आजच्या भागात ‘श्रीमती धनश्री यांनी अनुभवलेली संतांची प्रीतीमय छत्रछाया !’ याविषयी पाहूया.

११. संत आणि साधक यांनी दिलेला आधार !

११ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी आईच्या मायेने सांत्वन करणे, त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रीती अनुभवता येणे : ‘सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला भ्रमणभाषवर संपर्क केला. त्यांनी माझी आणि कुटुंबातील सर्वांची स्थिती समजून घेतली. ‘काय आणि कसे घडले ?’, हे जाणून घेतले आणि त्यांनी मला धीर दिला. त्यांच्या सत्संगातून मला चैतन्य प्राप्त झाले. त्या माझ्याशी इतक्या प्रेमाने आणि मायेने बोलत होत्या की, जणू ‘माझी आईच माझे सांत्वन करत आहे’, असे मला वाटले. त्यांच्या माध्यमातून मला श्री गुरूंची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) प्रीती अनुभवता आली आणि श्री गुरूंनी सांगितलेल्या वाटेवर चालण्यासाठी मला बळ प्राप्त झाले. परम दयाळू, प्रीतीस्वरूप, आम्हा लेकरांची मायमाऊली असलेल्या परात्पर गुरु डॉक्टर आणि संत यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

११ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, इतर संत आणि साधक यांनी भ्रमणभाष करून पुष्कळ आधार दिल्यामुळे मन स्थिर होणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ माझ्याशी बोलल्यावर मी आतून स्थिर झाले. माझ्या गुरुमाऊलीने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला सर्व सहन करण्यासाठी संतांच्या माध्यमातून शक्ती दिली. त्यामुळे कृतज्ञतेने माझे मन भरून आले. माझे लक्ष केवळ आणि केवळ माझ्या नामजपावर केंद्रित झाले होते. नंतरही १५ दिवस सातत्याने माझा दत्ताचा नामजप चालू होता. ‘कोटी कोटी रूपे तुझी…!’ हे वचन मी सत्यात अनुभवत होते. मला संत आणि अनेक साधक यांनी भ्रषणभाषवर संपर्क केला. प्रत्येकाने मला ‘श्री गुरु तुझ्या पाठीशी आहेत. काही लागले, तर कळव’, असे मला सांगितले. या साऱ्यांच्या माध्यमातून जणू प.पू. गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) मला सांगत होते, ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे !’

१२. सनातनच्या ग्रंथातील देवाण-घेवाण हिशोब यासंदर्भात लिहिलेले सूत्र आठवणे, नंतर ‘केवळ पूर्णवेळ साधनाच करावी’, असे वाटणे

त्यानंतर १ – २ दिवसांनी पहुडले असतांना मला सनातनच्या ग्रंथात प.पू. गुरुदेवांनी लिहिलेल्या एका सूत्राचे स्मरण झाले. त्या सूत्रात गुरुदेवांनी एका मनुष्यजन्मात असणाऱ्या देवाण-घेवाण हिशोबाच्या संदर्भातील टक्केवारी मांडली होती. ‘एका जन्मातील प्रारब्धानुसार पती-पत्नी यांच्यामध्ये ५० टक्के देवाण-घेवाण हिशोब असतो. इतर नातेसंबंध आणि आप्त यांचा १० – २० टक्के असा मिळून पूर्ण एका आयुष्यात १०० टक्के देवाण-घेवाण हिशोब असतो. जेवढे देवाण-घेवाण हिशोब शीघ्र गतीने समाप्त होतील, तेवढी साधनेला गती येते’, या सूत्राचे स्मरण झाल्यावर ‘श्री गुरूंना माझी किती काळजी आहे आणि माझी साधना व्हावी, याची किती तळमळ आहे’, असे मला वाटले. माझे यजमानांशी असलेले प्रारब्धभोग संपवल्याने गुरुदेव आता माझी साधना करवून घेणार आहेत’, या विचाराने माझ्याकडून गुरुदेवांप्रती कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली. त्याच क्षणी माझ्या मनात पूर्णवेळ साधना करण्याचा विचार आला. जीवनातील सर्वांत मोठी आसक्ती असणारा आणि जिचा त्याग करणे मला अशक्य होते, तो विषयच प्रारब्धवश आता माझ्या जीवनात राहिला नाही आणि आलेल्या प्रसंगावर मात करण्याचे धैर्य मला श्री गुरूंनीच दिले होते. त्यामुळे ‘पूर्णवेळ साधना करून माझे आणि माझ्या मुलांच्या जीवनाचे सार्थक करावे’, हा विचार माझ्या मनात जोर धरू लागला. एक दिवस पू. पात्रीकरकाकांशी बोलतांना त्यांनी मला ‘पूर्णवेळ साधना करण्याचा विचार करायला हरकत नाही’, असे सुचवले. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनात येत असलेला विचार योग्य आहे, हे पू. पात्रीकरकाकांशी बोलल्यावर स्पष्ट झाले.

१३. यजमानांचे मन मृत्यूच्या वेळी शांत आणि गुरुस्मरणात असल्यामुळे १० व्या दिवशी पिंडाला सहजतेने काकस्पर्श होणे

दहाव्या दिवशी पिंडदान आणि काकस्पर्श होता. माझ्या मनात कुठलीही चलबिचल किंवा त्यासंबंधी विचारही नव्हता. काकस्पर्शासाठी पान ठेवताक्षणी कावळ्यांनी अन्न ग्रहण केले. त्या वेळी ‘यजमानांच्या मनात मृत्यूसमयी कुठलीही चिंता, काळजी नसावी आणि मुखी नाम असावे. ते गुरुस्मरणात असल्यामुळेच कावळा त्वरीत पिंडाला शिवला’, असे मला वाटले.

१४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘रवींद्र यांचा पुढचा प्रवास चांगला होणार असून त्यांना सद्गती मिळणार आहे’, असे सांगणे, तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले पदोपदी साधकांच्या पाठीशी आहेत’, याची प्रचीती येणे

श्री. रवींद्र देशपांडे

‘गुरुदेवांनी साधकाचा एकदा धरलेला हात ते आयुष्यभर नव्हे, तर अगदी मृत्यूनंतरही सोडत नाहीत’, याची मला प्रचीती आली. रवींद्र यांच्या निधनाच्या पहिल्याच दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘त्यांचा पुढचा प्रवास चांगला होणार असून त्यांना सद्गती मिळणार आहे’, असे मला सांगितले होते. ‘तसे ते प्रत्यक्ष घडत आहे’, या जाणिवेने मला श्री गुरूंच्या सर्वशक्तीमानतेची जाणीव झाली. ‘पदोपदी श्री गुरु माझ्या पाठीशी आहेत’, या जाणिवेने माझ्या मनात कृतज्ञतेचा भाव दाटून आला.

१५. रवींद्र यांच्या निधनानंतर नातेवाइकांशी पुष्कळ स्थिरतेने बोलता येणे आणि ‘हे केवळ गुरुकृपेमुळे शक्य झाले’, असे अनुभवणे

साधारणपणे पहिले १५ दिवस मला श्रीगुरुकृपेने पुष्कळच स्थिर रहाता आले. जसजसे समाजात या प्रसंगाविषयी कळत गेले, तसतसे नातेवाईक आणि इतर परिचित अशा अनेकांचे दूरभाष येऊ लागले. घरातील इतर मंडळी भावनाप्रधानतेमुळे प्रत्येकाशी बोलू शकत नव्हती. माझ्याकडील भ्रमणभाषवर जितके भ्रमणभाष आले, त्या सर्वांशी मी स्थिरतेने बोलू शकत होते. ‘ज्यांचे आपल्याला भ्रमणभाष येतात, त्यांना आपल्याविषयी आपलेपणा आणि कणव वाटत असते. त्यामुळे त्यांचे भ्रमणभाष घेणे टाळण्यापेक्षा त्यांच्याशी बोलायला हवे’, असा विचार श्री गुरुदेवच मला देत होते. ज्यांनी काही कामानिमित्त यजमानांच्या भ्रमणभाषवर संपर्क केले, त्या कित्येकांना मीच यजमानांच्या निधनाची वार्ता दिली. ही सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी गुरुदेवच मला बळ देत होते.

१६. भविष्याच्या विचाराने काळजी वाटून भावनाशील होणे, गुरुदेवांच्या छायाचित्राशी बोलणे आणि त्याविषयी पू. पात्रीकरकाका यांनीही मार्गदर्शन करणे

यजमानांच्या निधनानंतर साधारणपणे १५ ते २० दिवस माझा दत्ताचा नामजप चांगला चालू होता. नंतर जसजसे एकेक दिवस पुढे सरकू लागले, तसे ‘आता पुढे काय ?’, असे अनेक प्रश्न माझ्या पुढे उभे राहिले. तेव्हा मात्र भविष्याचा विचार करून मला कधीकधी रडू येत असे आणि पुष्कळ हतबल झाल्यासारखे अन् एकटे पडल्यासारखे वाटू लागले. माझा ‘भावनाशीलता’ हा स्वभावदोष प्रबळ होऊ लागला. मग मी प.पू. गुरुदेवांच्या ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन – भाग १’ या ग्रंथावरील त्यांच्या छायाचित्राशी बोलत असे. पू. पात्रीकरकाका यांनीही मला ‘अशा वेळी कसे वागायला हवे ?’ याविषयी मार्गदर्शन केले. अशा प्रकारे मला परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा पदोपदी अनुभवायला मिळाली.

‘प.पू. गुरुदेवा, या कठीण प्रसंगातून आपण माझ्याकडून पदोपदी साधनेचे धडे गिरवून घेतलेत आणि जगायला शिकवलेत. पू. पात्रीकरकाकांच्या माध्यमातून या क्षुद्र जिवाला आपण आधार दिलात, यासाठी कोटीशः कृतज्ञता !’  (समाप्त)