भोंगे आणि अध्यात्म

सध्या देशभरात मशिदींवरील भोंग्यामुळे होणाऱ्या आवाजावरून वातावरण बरेच तापले आहे. भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाची समस्या बरीच जुनी आहे. यावरून विविध राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका घोषित केली आहे. यामुळे गोंधळाच्या वातावरणात अधिकच भर पडली आहे. यासंदर्भात ‘अध्यात्म काय सांगते ?’, याचा विचार पुढील विवेचनावरून वाचकांच्या लक्षात येईल.

१. मशिदी आणि मंदिरे यांवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांमुळे ध्वनीप्रदूषण होणे

अ. मशिदींवरील भोंग्यांवरून अजान दिली जाते. ती जरी मशिदीच्या परिसरात रहाणाऱ्या मुसलमानांना नमाजपठणास प्रवृत्त करण्यासाठी असली, तरी तिचा त्रास त्या परिसरातील अन्य धर्मियांना होतो. असे भारतभरात सर्वत्र घडते आहे.

आ. सध्या मंदिरांवरही भोंगे लावण्यात येतात आणि त्यावरून मोठ्या आवाजात भजने, कीर्तने लावली जातात.

२. हिंदु धर्मात व्यक्तीगत आणि सामाजिक आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय दिलेले असणे

श्री. धैवत वाघमारे

यावर अध्यात्माचा विचार अभ्यासायला हवा. हिंदु धर्म मुळातच सहिष्णू आहे; कारण अध्यात्म हा हिंदु धर्माचा पाया आहे. येथे बाह्य अवडंबरापेक्षा अंतरात्म्याला जाणून व्यक्तीची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती करून घेतली जाते, तसेच धर्माचरण करून सृष्टीला सुखी करण्याची शिकवण दिली जाते. याचा अर्थ व्यक्तीगत जीवन आणि सामाजिक जीवन यांत कुणालाही कुणामुळे त्रास होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली जाते.

३. व्यक्तीने अंतर्मुख होऊन शारीरिक स्तरावर प्रकट होणाऱ्या बाह्य कृती टाळणे आवश्यक असणे

अध्यात्मात अंतर्मुख होण्याला अधिक महत्त्व आहे. जोपर्यंत मानव बाह्य अवडंबर करतो, तोपर्यंत त्याला खऱ्या सुखाकडे वळता येत नाही आणि त्याला आनंदाची अनुभूती घेता येत नाही. व्यक्तीचे शरीर, मन आणि बुद्धी यांना पूर्णतः अंतरात स्थिर केल्यावर आनंदाची अनुभूती घेता येते. ही गोष्ट साध्य करायची, तर जोरजोराने अजान देणे, मोठमोठ्याने आरत्या म्हणणे इत्यादी शारीरिक स्तरावर प्रकट होणाऱ्या बाह्य कृती टाळायला हव्यात. याचा अर्थ नमाज म्हणू नये किंवा आरत्या म्हणू नयेत, असा होत नाही; परंतु त्यांचे अवडंबर माजवणे अयोग्य आहे. त्यामुळे कोणत्याच धार्मिक कार्यक्रमात टाळ्या वाजवू नयेत, असे अध्यात्मशास्त्र सांगते; कारण त्यामुळे व्यक्ती बहिर्मुख होतो.

४. समाज निरोगी रहाण्यासाठी व्यक्तीगत आणि सामाजिक मर्यादांमधील पुसटशी रेषा समजून घेणे आवश्यक असणे

आनंद हा अंतरात अनुभवायचा असतो. जेवढ्या बाह्य कृती अधिक, तेवढा आनंद अल्प आणि जेवढी एकाग्रता अधिक तेवढे आनंदाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे भोंग्यांवरून मोठमोठ्याने अजान देणे, भजने लावणे इत्यादी गोष्टी आंतरिक आनंदाला मारक असतात. समाज निरोगी रहायचा, तर जिथे इतरांचे स्वातंत्र्य चालू होते, तिथे स्वतःचे स्वातंत्र्य संपते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि भोंग्यांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण बंद केले पाहिजे.

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०२२)