मनसेचे पदाधिकारी पोलिसांच्या भूमिकेवर अप्रसन्न
सोलापूर – येथील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे घर अन् कार्यालय येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, मनसेचे नेते प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, अभिषेक रंपुरे, राहुल अक्कलवाडे यांनी येथील सोन्या मारुति आणि गणपति मंदिरासमोर महाआरती करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार भोंगे आणि ॲम्प्लिफायर लावण्यात आले होते; मात्र पोलिसांनी भोंगे वाजवण्यापासून त्यांना रोखले, तसेच सर्व साहित्यही जप्त केले. पोलिसांनी साहित्य जप्त केल्याने मनसेच्या पदाधिकार्यांनी तोंडी आरती आणि हनुमान चालिसा म्हणून राज ठाकरे यांच्या आवाहनाला साथ दिली.
जप्त करायला आमच्याकडे शस्त्रे किंवा हत्यारे होती का ? – मनसेचे नेते प्रशांत इंगळे यांची प्रतिक्रिया
जप्त करण्यासाठी आमच्याकडे शस्त्रे किंवा हत्यारे होती का ? पोलिसांनी सूडबुद्धीने आमचे भोंगे आणि ‘ॲम्प्लिफायर’ जप्त केले आहेत. राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य असतो.
मनसेच्या पदाधिकार्यांना पोलिसांकडून नोटीस !
सोलापूर – मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर पोलिसांनी ४ मे या दिवशी जिल्ह्यात अक्कलकोट, बार्शी यांसह ठिकठिकाणी ३ सहस्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता. या पार्श्वभूमीवर मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना विजापूर नाका पोलिसांनी, तर ग्रामीणमधील काही कार्यकर्त्यांना संबंधित पोलिसांनी नोटीस बजावली आहे, तर काही कार्यकर्त्यांना ४ मे या दिवशी पोलिसांनी नजरकैदही केले होते. ‘नेत्यांच्या सांगण्यावरून कोणतेही प्रक्षोभक वर्तन, भाषण, घोषणाबाजी किंवा गैरकृत्य केल्यास कठोर कारवाई केली जाईल’, असे नोटीसीमधून स्पष्ट केले आहे. या नोटीसीनुसार संबंधिताला किमान ६ मासांची शिक्षा होऊ शकते.