संघटना, पद यांच्या पलीकडे जाऊन राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

फरिदाबाद (हरियाणा) येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

फरिदाबाद (हरियाणा) – हिंदूंच्या प्रत्येक समस्या सोडवायला अनेक वर्षे लागतील. त्यामुळे सर्व समस्यांना मुळापासून नष्ट करायचे असेल, तर आपल्या संघटितपणे धर्मावर आधारित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य केले पाहिजे. जेव्हा आपण संघटना, पद, मानसन्मान यांच्या पलीकडे जाऊन कार्य करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याकडून राष्ट्र आणि धर्म यांची सेवा होऊ शकणार आहे. हे साध्य करण्यासाठी आज आपण प्रत्येकाने साधना करून आपली कुंडलिनी शक्ती जागृत करण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. समितीच्या वतीने येथील सेक्टर २८ मधील श्री रघुनाथ मंदिरामध्ये प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला संबोधित करतांना ते बोलत होते. या वेळी मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे पुढे म्हणाले,

१. वर्ष १९४७ ला इंग्रज भारत सोडून गेले; परंतु अद्यापही त्याच व्यवस्थेप्रमाणे भारताची शासन व्यवस्था चालू आहे आणि हिंदूंना धर्मापासून विन्मुख करण्यात आले आहे. त्याचे दुष्परिणाम व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांच्या जीवनात दिसून येत आहेत,

२. जेव्हा समाज त्याचा धर्म आणि कर्तव्य सोडून देतो, तेव्हा वाईट काळ चालू होतो. हिंदु धर्मामध्येच प्रत्येक मंत्राच्या शेवटी ‘ॐ शांती शांती शांती’ असे म्हटले जाते. हे केवळ मनाच्या शांतीसाठी म्हटले जात नाही, तर आधिदैविक, आधिभौतिक आणि आधिदैविक (आध्यात्मिक) अशा ३ स्तरावरील अशांती दूर करण्यासाठी प्रयत्नांचा संकल्प केला जातो. यावरून आमच्या ऋषीमुनींची दूरदृष्टी आणि सनातन धर्म यांची महानता लक्षात येते.

. अन्य धर्मियांना त्यांच्या पूजास्थळी जाण्यात अभिमान वाटतो, तर हिंदूंना मंदिरात जाण्याची लाज वाटते. आज आम्ही कशावरून हिंदू आहोत, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

अधिवेशनाला उपस्थित संत आणि हिंदुत्वनिष्ठ

फरिदाबाद येथील श्री पंच दशनाम जुना अखाडा तथा प्रधान आणि श्री बांके बिहारी मंदिराचे (एन्.आय.टी.) महंत ललित गिरी गोसाई, बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. जगदीश चौधरी, धर्म जागरणचे फरीदाबाद विभागप्रमुख योगेंद्र कुमार, ज्योतिषाचार्य भैरव वशिष्ठ, धर्म जागरण मंचाच्या रेणू अग्रवाल, ‘विरांगना वाहिनी’च्या (हिंदु जागरण मंच) प्रांत सहसंयोजिका अधिवक्ता दीपशिखा भारद्वाज, हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. संदीप मुंजाल, समितीचे श्री. कार्तिक साळुंके

हिंदु धर्म आणि संस्कृती वाचली, तरच स्वतःचे रक्षण होईल ! –  पंडित सुरेंद्र शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण सभा

आज अन्य पंथाचे लोक कोणतेही लहान मोठे काम करण्यासाठी सिद्ध असतात; पण तेच काम हिंदूंना करायला लाज वाटते. आज हिंदूंना अभियंता, आधुनिक वैद्य (डॉक्टर), अधिवक्ता यांचे शिक्षण देण्यासमवेतच धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. आपला (हिंदु) धर्म आणि संस्कृती वाचली, तरच स्वतःचे रक्षण होईल, हे लक्षात ठेवा.

मुलांना संस्कार दिले नाही, तर आम्हालाही दु:ख भोगावे लागेल ! – महंत ललित गिरी गोसाई, श्री पंच दशनाम जुना अखाडा तथा प्रधान, श्री बांके बिहारी मंदिर, एन्.आय.टी., फरिदाबाद

आज हिंदूंना संस्कार आणि हिंदु धर्माचे ज्ञान नाही. त्यामुळे ते मंदिरात जात नाहीत, जानवे घालत नाहीत, गायत्री मंत्र म्हणत नाहीत आणि त्यांना हनुमान चालिसाही येत नाही. ते नमस्कार करण्याऐवजी ‘हाय हॅलो’ म्हणतात. त्यामुळे आज मुलांना संस्कार दिले नाही, तर आम्हालाही दु:ख भोगावे लागेल.

आज शिक्षण संस्थांमध्ये सर्व अज्ञान शिकवले जाते ! – जगदीश चौधरी,  संस्थापक अध्यक्ष, बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन

सनातन नित्य नूतन आहे. आज आम्हाला अज्ञानाची नाही, तर ज्ञान प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. आज शिक्षण संस्थांमध्ये जे शिकवले जाते, ते सर्व अज्ञान आहे. मेकॉलेने भारतात अशी व्यवस्था निर्माण केली की, व्यक्ती त्याचे चरित्र विसरून जाईल आणि गुरुकुल नष्ट होतील. गुरुगोविंदजी यांच्या काळात ‘जीव जाईल; पण मान वाकणार नाही’, अशी हिंदूंची मानसिकता होती; परंतु आधुनिक शिक्षणव्यवस्थेमुळे आमची मान सतत वाकलेलीच असते.

हिंदु धर्माला सोडून जाणारा आपला कट्टर शत्रू होतो ! – योगेंद्र कुमार, विभागप्रमुख, धर्म जागरण, फरिदाबाद 

आज लव्ह जिहादच्या जाळ्यात फसणाऱ्या मुलींची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे केवळ धर्मांतरच नाही, तर मतांतरही होत आहे. जो आपल्या धर्माला सोडून जातो, तो आपला कट्टर शत्रू होत आहे. आज लोकसंख्येत जे असंतुलन निर्माण झाले आहे, त्यामागे ‘लव्ह जिहाद’ आहे.

सामाजिक माध्यमांमुळे हिंदू जागृत होत आहेत ! – ज्योतिषाचार्य भैरव वशिष्ठ

आज सामाजिक माध्यमांचा उपयोग हिंदु धर्माच्या प्रसारासाठी होत आहे. त्यामुळे हिंदू निश्चित जागृती होतील आणि लवकरच परिवर्तनाची वेळ येईल. ज्योतिषशास्त्रामध्ये केवळ येणाऱ्या काळाविषयी सांगितले जात नाही, तर त्यावरील रक्षणाचे उपायही सांगितले जातात. आपत्काळापासून सुरक्षा करण्याविषयी सनातन संस्थेने निर्मिलेले ग्रंथ वाचून मी अतिशय प्रभावित झालो आहे.

हिंदूंना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणे आवश्यक ! – रेणू अग्रवाल, धर्म जागरण मंच

आज हिंदूंमध्ये शौर्यजागृतीची आवश्यकता आहे. भारत विरांची भूमी आहे. शौर्याच्या अभावी हिंदू मार खात आहे. ज्याप्रमाणे हनुमंताला तो समुद्र ओलांडू शकतो, याची जाणीव करून दिली, त्याप्रमाणे हिंदूंनाही त्यांच्या शक्तीची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे.

हिंदु कुटुंबांनी धर्माचरण आणि संस्कार यांकडे लक्ष द्यावे ! – अधिवक्ता दीपशिखा भारद्वाज, प्रांत सहसंयोजिका, विरांगना वाहिनी (हिंदु जागरण मंच)

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ कायद्यामुळे होणारी हिंदु धर्माची हानी थांबवणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी धर्माचे आचरण आणि संस्कार यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.