केंद्र सरकारने मराठी भाषेला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा !

मराठी साहित्य संमेलनातील ठराव

उदगीर (जिल्हा लातूर), २५ एप्रिल (वार्ता.) – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्यशासनाने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे; मात्र हा प्रस्ताव प्रलंबित असून तो लवकरात लवकर मार्गी लावावा आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने द्यावा, अशी मागणी ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठरावाद्वारे करण्यात आली, तसेच मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाण वेगाने वाढत असून हा चिंतेचा विषय आहे. मराठी शाळा बंद पडू नयेत यासाठी शासनाने कृती कार्यक्रम आखावेत. मराठी शाळांची मागणी करणाऱ्या महाराष्ट्रातील आणि बृहन्महाराष्ट्रातील संस्था यांना, तसेच महाविद्यालये यांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली.

पानीपतच्या लढाईचा प्रारंभ उदगीर येथून झाला असून येथूनच सदाशिवरावभाऊ यांनी पानीपतची मोहीम आखली होती. उदगीरच्या या किल्ल्यात उदगीर बाबांची समाधी असल्याने या शहराला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वही आहे. असे असले, तरी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे या किल्ल्याकडे पुरेसे लक्ष नाही. त्याची डागडुजी आणि स्वच्छताही होत नाही. महाराष्ट्र शासनाने या किल्ल्याकडे लक्ष देऊन आर्थिक साहाय्य करून किल्ल्याचे जतन करावे. उदगीर किल्ल्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याला पर्यटन क्षेत्राचा ‘अ’ दर्जा देण्यात यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.