समाज, राष्ट्र यांना अनुकूल असे लिखाण साहित्यातून व्हावे ! – नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूक आणि रस्ते परिवहन मंत्री

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप !

येथे भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे २२ एप्रिल या दिवशी प्रारंभ झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सौ. गडकरी यांच्या उपस्थितीत २४ एप्रिल या दिवशी झाली. या वेळी व्यासपिठावर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्तकर्ते दामोदर मावजो, स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, पालकमंत्री अमित देशमुख, संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी व्यासपिठावर मान्यवर वक्त्यांनी मनोगत मांडले.


उद्गीर, २४ एप्रिल (वार्ता.) – स्वामी विवेकानंद यांनी २१ वे शतक हे भारताचे असेल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे जगाला मार्गदर्शन करण्याची कुवत आपल्याला निर्माण होण्यासाठी प्रत्येक विषयावर प्रबोधन करणारे साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे. समाजात चांगले-वाईट असे सर्वच असते; मात्र आपल्याला गुणात्मक परिवर्तन करणाऱ्या आणि विकासाची दिशा देणाऱ्या साहित्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यापुढील काळात समाज, राष्ट्र यांना अनुकूल असे लिखाण साहित्यातून व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय वाहतूक आणि रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ते ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

नितीन गडकरी पुढे म्हणाले, ‘‘परदेशात आज समाजव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे; मात्र भारतीय जीवन पद्धती ही मूल्याधिष्ठीत आहे त्यामुळे येथील संस्कृती टिकून आहे. या देशातील शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे, हे माझे स्वप्न आहे. आपण जे लिखाण करतो, त्या लिखाणामागील भाव आणि उद्दिष्टे महत्त्वाची आहेत. त्यामुळे समाज आणि देश घडवण्याचे दायित्व साहित्यिकांवर आहे. संगीत, नृत्य, साहित्य या सगळ्याच्या सान्निध्यात गेल्यावर आपल्याला संस्कार प्राप्त होतात आणि ते माणसाचे जीवन घडवतात. उत्तम, अधिक उत्तम, सर्वाेत्तम बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.’’

नितीन गडकरी यांच्या भाषणाच्या अगोदर मंत्री संजय बनसोडे आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी ‘सीमाभागाचा प्रश्न सोडवण्यासाठी नितीन गडकरी यांनी पुढाकार घ्यावा’, असे आवाहन केले.

संपादकीय भूमिका

  • समाज, राष्ट्र यांना अनुसरून साहित्य घडण्यासाठी साहित्यिक धर्माचरणी हवा !