संतांच्या प्रत्येक साहित्यात पर्यावरणाविषयी सखोल माहिती ! – प्रा. किरण वाघमारे, अकोला

‘मराठी साहित्यात निसर्गचित्रण आहे, पर्यावरण नाही’, यावर परिसंवाद !

उदगीर, २४ एप्रिल (वार्ता.) – मराठी साहित्यात निसर्गचित्रणाएवढेच पर्यावरणही आहे; मात्र त्याचा आपण शोध घेतला पाहिजे. १२ व्या शतकात लिहिण्यात आलेल्या ‘लिळाचरित्र’ ग्रंथांत झाड, पशू, पक्षी यांच्यात समन्वय कसा राखावा ? त्यांचे जतन करावे, याचे यथोचित वर्णन आहे. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या प्रत्येक अभंगात निसर्गाविषयी माहिती आहे. ज्ञानेश्वरीच्या पानापानांत पर्यावरण आहे. समर्थ रामदासस्वामी यांनी ‘बाग’ या विषयावर दासबोधात वर्णन केले असून त्यात २८ समास पर्यावरणाला वाहिले आहेत. यात ३०० वृक्षांची माहिती आहे. त्यामुळे संतांच्या प्रत्येक साहित्यात पर्यावरणाविषयी सखोल माहिती आहे, असे मत अकोला येथील प्रा. किरण वाघमारे यांनी व्यक्त केले. ते ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी साहित्यात निसर्गचित्रण आहे, पर्यावरण नाही’, यावर आयोजित परिसंवादात बोलत हाते.

परिसंवादातील अन्य मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार

१. कोल्हापूर येथील गोमटेश्वर पाटील म्हणाले, ‘‘रुक्मिणी स्वयंवर, राधा-कृष्ण, नल-दमयंती यांच्या संदर्भात लिहिलेल्या साहित्यात निसर्गाचे वर्णन आहे. अगदी अलीकडच्या काळात गो.नी. दांडेकर यांच्याही लेखनात ते आढळते.’’

२. प्रा. अनिरुद्ध मोरे म्हणाले, ‘‘या पुढील काळात पर्यावरणाचे संदर्भ देऊन लिखाण करावे लागेल. निसर्ग आहे; म्हणून आपण आहोत, ही जाणीव आपल्याला ठेवावी लागेल.’’

३. गोवा येथील अनिता तिळवे म्हणाल्या, ‘‘पर्यावरण या शब्दात पंचमहाभूतांना गवसणी घालण्याची क्षमता आहे. समर्थ रामदासस्वामी यांनी दासबोधात पृथ्वी, पाणी, उष्णता, आकाश, वनस्पती, अरण्ये यांचे सविस्तर वर्णन केले आहे. आपली संस्कृती निसर्गाशी एकरूप असणारी आहे; मात्र आज आपण या संस्कृतीचा ऱ्हास करत आहोत.’’

४. आपल्या अध्यक्षीय भाषणात अतुल देऊळगावकर म्हणाले, ‘‘भूता परस्परे जडो’, अशा आपल्या संस्कृतीत सध्या वर्षाला ६ ते ८ एकर जंगल नष्ट होत आहे. युरोपात १६ व्या शतकात सिद्ध झालेला वसाहतवाद निसर्गाला नष्ट करत असून आताही तेच होत आहे. ’’

क्षणचित्रे

१. परिसंवाद १ घंट्यापेक्षा अधिक काळ विलंबाने चालू झाला आणि या परिसंवादासाठी ९० टक्केपेक्षा अधिक सभागृह रिकामे होते.

२. परिसंवाद चालू असतांना व्यासपिठावर असणारे अन्य वक्ते एकमेकांशी गप्पा मारत होते.