राजस्थानमध्ये घरांवर धार्मिक ध्वज फडकावण्यावर बंदी !

राजस्थानच्या काँग्रेस सरकारचा हिंदुद्रोही निर्णय

  • ब्रिटिशांच्या काळात जसे निर्बंध घालण्यात आले होते, तशाच प्रकारचे निर्बंध आता काँग्रेस सरकार घालत आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • राज्यघटनेने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. त्याचे हे उल्लंघन आहे. अन्य वेळी राज्यघटनेच्या रक्षणाविषयी बोलणारे आता गप्प का आहेत ? – संपादक

जयपूर – राजस्थानच्या करौली येथे २ एप्रिल २०२२ या दिवशी झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर राजस्थानमधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने घरांवर धार्मिक ध्वज फडकावण्यावर बंदी घातली आहे. याखेरीज मिरवणुकांमध्ये ‘डीजे’ (मोठी संगीत यंत्रणा) वाजवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दुर्गा अष्टमी, रामनवमी, आंबेडकर जयंती, महावीर जयंती आणि हनुमान जयंती या हिंदु सणांच्या कालावधीत हे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच घरासमोरून जाणारी मिरवणूक पहाण्यासाठी लोकांना घराच्या छतावर उभे रहाण्याची अनुमती दिली जाणार नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच १४४ कलम (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे. तसेच या मिरवणुकांवर ड्रोनद्वारे (मानवरहित हवाई यंत्राद्वारे) लक्ष ठेवण्यात येणार आहे.

मिरवणुकीच्या वेळी ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई आहे. कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेला कुठल्याही कार्यक्रमात किंवा उत्सवात ‘डीजे’ वापरण्यासाठी पूर्व अनुमती घेणे बंधनकारक आहे. हे निर्बंध ७ एप्रिल २०२२ पासून लागू झाले असून ९ मेपर्यंत लागू रहातील, असे सरकारी आदेशात म्हटले आहे.